मोदी, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : उमा पानसरे, जेल भरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:45 PM2018-02-20T20:45:35+5:302018-02-21T05:36:27+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही आरोपी मोकाट फिरत आहेत. विचारवंतांच्या दिवसाढवळ्या हत्या होऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करतेय.

Modi, Fadnavis should resign: Uma Pansare, Jail Bharo movement | मोदी, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : उमा पानसरे, जेल भरो आंदोलन

मोदी, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : उमा पानसरे, जेल भरो आंदोलन

Next
ठळक मुद्देपानसरे व दाभोलकर खुनांतील आरोपींना दहशतवादी जाहीर करावे. ७० हून अधिक कार्यकर्त्यांना अटक, सुटका : गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे जेल भरो आंदोलन- पानसरे खून प्रकरणातील फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर व सूत्रधारांना ताबडतोब अटक करा.- आरोपी समीर गायकवाड व वीरेंद्र तावडेचे जामीन उच्च न्यायालयामध्ये रद्द होण्यासाठी तातडीने सबळ पुराव्यांसह सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या अटकेसाठी ‘लुक आऊट’ नोटीस जारी करावी.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही आरोपी मोकाट फिरत आहेत. विचारवंतांच्या दिवसाढवळ्या हत्या होऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करतेय. त्यामुळे अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका उमा पानसरे यांनी मंगळवारी येथे केली. कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दीड तास सत्याग्रह करून जेल भरो आंदोलन केले. यामध्ये ७० हून अधिक जणांना पोलिसांनी अटक करून सुटका केली.
दुपारी साडेबाराच्या सुमारास रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. तब्बल दीड तास हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

उमा पानसरे म्हणाल्या, पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे होऊनही आरोपी मोकाट आहेत, हे निषेधार्थ आहे. यामध्ये अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन परदेशात जावे.माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, पानसरे हत्येचा तपास तीन वर्षे होऊनही पूर्ण होत नाही, हे पुरोगामी कोल्हापूरसाठी लांच्छनास्पद आहे. जे पकडलेले आरोपी आहेत, त्यांनाही हे भाजपचे सरकार सोडत आहे. यामागे सरकारचा पोलिसांवर नक्कीच दबाव आहे.

लाल निशाण पक्षाचे अतुल दिघे म्हणाले, भाजप सरकारने पुरोगामी नेत्यांची हत्या होताना बघ्याची भूमिका घेतली; परंतु बॉम्बस्फोटामध्ये आरोप असलेल्या प्रज्ञासिंह यांना सोडून देण्यात आले. याच प्रज्ञासिंह आता हेमंत करकरे यांना शहीद मानायला तयार नाहीत, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे.

‘माकप’चे कॉ. चंद्रकांत यादव म्हणाले, भाजप सरकार व ‘आरएसएस’वाल्यांना सत्ता स्थापन करताना प्रमुख अडसर हा पुरोगामी नेत्यांचा होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. या सरकारला घालविल्याशिवाय पानसरेंचे मारेकरी सापडणार नाहीत.

किसान सभेचे नामदेव गावडे म्हणाले, पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात आम्ही आज सरकारला जाब विचारायला आलो आहोत. या हत्येचा खोलवर जाऊन तपास केला नाही तर आम्ही भविष्यात अटक करून घेऊन जामीन न घेता तुरुंगातच राहण्याचे आंदोलन करु.

‘भाकप’चे सतीशचंद्र कांबळे म्हणाले, पानसरे हत्येच्या तपासात दिरंगाई करणाºया सरकारला जनता निवडणुकीत धडा शिकवील.

नौजवान सभेचे गिरीश फोंडे म्हणाले, जर न्यायाधीशच रस्त्यांवर येऊन न्याय मागत असतील तर या व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवायचा? क्रांतिकारकांना मारता येते; पण क्रांतीला नाही, हे जातीयवादी संघटनांनी लक्षात घ्यावे.
हसन देसाई यांनी पानसरे हत्येच्या तपासातील दिरंगाईबद्दल केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला.

सत्याग्रह आंदोलनानंतर उमा पानसरे व डॉ. टी. एस. पाटील, उदय नारकर, व्यंकाप्पा भोसले, दिनकर सूर्यवंशी, रवी जाधव, बी. एल. बरगे, सीमा पाटील, संभाजी जगदाळे, शंकर काटाळे, आरती रेडेकर, प्रशांत आंबी, सुनीता अमृतसागर, रमेश वडणगेकर, लक्ष्मण वायदंडे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शासकीय विश्रामगृह येथे नेऊन सुटका केली.
१९ राज्यांत आंदोलन
पानसरे हत्येच्या दिरंगाईबद्दल मंगळवारी कोल्हापूरसह देशातील १९ राज्यांत हे जेल भरो आंदोलन करण्यात आल्याचे फोंडे यांनी सांगितले.


 ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण होऊनही तपास पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे सत्याग्रह व जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून काही वेळानंतर त्यांची सुटका केली.
 

 

Web Title: Modi, Fadnavis should resign: Uma Pansare, Jail Bharo movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.