दागिने, संपत्ती, आरक्षणाबाबत मोदींचा खोटा प्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:29 PM2024-05-02T16:29:19+5:302024-05-02T16:30:25+5:30
'काळा पैसा एका व्यक्तीच्या नावावर'
कोल्हापूर : काँग्रेस सत्तेत आल्यास तुमच्या दागिन्यांचे ऑडिट होईल, स्वकमाईच्या संपत्तीचे अल्पसंख्याकांना वाटप होईल, वारसा कर लावला जाईल, ओबीसी, एससी, एसटीचे आरक्षण बदलले जाईल, असा खोटा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. ज्या गोष्टी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातच नाहीत, काँग्रेसचा काेणी नेता तसे बोललेला नाही, अशा खोट्या गाेष्टी सांगून मोदी जनतेत संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला.
दहा वर्षे सत्तेत असणाऱ्या मोदी आणि भाजपने असला खोटा प्रचार करण्याचे सोडून त्यांनी केलेल्या विकास कामांवर बोलावे, जी कामे अपूर्ण आहेत त्यावर बोलावे. अब की बार ४०० पार असा आत्मविश्वास मोदींचा असेल तर मग अशा खोट्या प्रचाराची का आवश्यकता भासत आहे याचे आश्चर्य वाटत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
सॅम पित्रोदा हे भारताचे नागरिकही नाहीत, त्यांनी कुठे वक्तव्य केले त्याचा भारताशी काहीही संबंध नसताना वारसा कर लावला जाईल असा कांगावा मोदी यांच्याकडून केला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे. उलट भारतात लागू असलेला वारसा कराचा कायदा राजीव गांधी पंतप्रधान असताना १९८५ मध्ये रद्द करण्यात आला, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.
जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडालेला आहे, परत सत्तेवर येऊ की नाही याबाबत मोदींना आत्मविश्वास राहिलेला नाही म्हणून ते खोटी भीती घालून, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
काळा पैसा एका व्यक्तीच्या नावावर
परदेशी बँकेत असलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. काळ्या पैशाबाबतची संपूर्ण माहिती स्वीस बँकेकडून तसेच पनामा पेपर्सच्या माध्यमातून सरकारकडे आहे. त्यांची नावे, पत्ते, रक्कम याची माहिती असूनही केंद्र सरकार कारवाई करत नाही. केवळ सेटलमेंट करण्यात येत आहे. आता हा सगळा काळा पैसा भारतातील एका व्यक्तीच्या खात्यावर जमा झाला असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.