मोदी पंतप्रधान होण्यासाठी मंडलिकांना निवडून आणू : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 05:24 PM2019-03-15T17:24:37+5:302019-03-15T17:26:52+5:30
आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर : आयुष्यात कमी वेळा अवघड प्रसंग येतात. असे प्रसंग आलेल्यांमध्ये माझ्यासह अमल महाडिक व शौमिका महाडिक आहेत. कारण माझे मित्र व अमल यांचे भाऊ तर शौमिका यांचे दीर धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे मनामध्ये द्विधा निर्माण झाली आहे. परंतु आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने ही द्विधा संपवून मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
असेंब्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, माझ्यासमोर आलेला प्रसंग इतिहासात अनेकांना अनेकवेळा आलेला आहे. महाभारतात तो अर्जुनालाही पडला होता. परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील द्वंद्व संपवून धर्मासाठी लढण्याचे आवाहन केले. त्यानुसार आम्हालाही आमच्या मनातील द्वंद्व संपवून युतीधर्मासाठी लढावे लागेल.
हे करताना समोर मित्र असल्याने मनामध्ये खूप दु:ख होणार आहे. परंतु युती धर्म महत्वाचा असल्याने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. आता युध्द जाहीर झाले असून पक्ष व उमेदवारही स्पष्ट झाले आहेत.
त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनात कोणतीही किंतु व परंतु राहू नये यासाठी त्यांची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. युतीसाठी जीवाचे रान करायचे आहे. पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचे हे जनतेने ठरविले आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागायचे आहे.
महाडिक युतीचे उमेदवार होण्याच्या प्रयत्नाला अपयश
पालकमंत्री पाटील म्हणाले, खासदार धनंजय महाडिक हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार व्हावेत, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. मात्र, मी महाडिक यांच्या बाणेदारपणाला खूप गुण देतो. कारण त्यांनी ठामपणे सांगितले की मी राष्ट्रवादीतून खासदार झाल्याने या पक्षासोबतच मला राहीले पाहीजे. असे म्हणणारी माणसे राजकारणात खूप कमी आहेत.