मोदींनी स्टॅलिनप्रमाणे आंदाेलन चिरडू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:39 AM2020-12-16T04:39:19+5:302020-12-16T04:39:19+5:30
कोल्हापूर : दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने ...
कोल्हापूर : दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने रशियात असेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर रणगाडे घालून बळाच्या जोरावर आंदोलन चिरडले होते. आता पंतप्रधान मोदींनी दुसरे स्टॅलिन होऊ नये, नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. विधेयक मागे घेईपर्यंत शेतकरी अजिबात मागे हटणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने मोदींनी पुढचा धोका ओळखून मनाचा मोठेपणा दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दिल्लीतील चारही बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेट्टी हे कोल्हापुरात परतले आहेत. तेथील अनुभव त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीत कथन केला व मोदींना सबुरीचा सल्लाही दिला. ते म्हणाले, पंजाब, हरयाणातील प्रत्येक कुटुंबातील एकेक सदस्य आंदोलनाला बसला आहे. जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, वृद्धासह तरुणही आंदोलनात आहेत, जीव गेला तरी मागे हटायचे नाही, अशी त्यांची ठाम मानसिकता आहे. आतापर्यंत १४ जणांचा बळीही गेला आहे. निकराने लढा सुरूच ठेवला आहे. राष्ट्रीय महामार्ग वीस दिवसांपासून बंद आहे. तरीदेखील मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आपल्या भडकाऊ वक्तव्याने जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. भडका उडाला तर त्याची किंमत देशाला मोजावी लागेल, तेव्हा मोदी यांनी दोन पाऊले मागे घेत हे विधेयक मागे घ्यावे.
स्टॅलिनचे आंदोलन काय होते
सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट क्रांतीचा स्टॅलिन हा हिरो होता. लेनिनच्या काळात तो लष्करशहा होता. लेनिनच्या मृत्यूनंतर तो वारसदार म्हणून सत्तेवर आला, पण निरंकुश सत्तेमुळे त्याच्यातील क्रूरता वाढीस गेली. त्याने जमिनीचे राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला, त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला, जनआंदोलन पेटले, पण स्टॅलिन मागे हटला नाही. त्यांनी विरोधासाठी रस्त्यावर आलेल्या दहा लाख शेतकऱ्यांच्या अंगावर रणगाडे घालून आंंदोलन चिरडले. याचा पुढे दीर्घकालीन परिणाम होऊन रशियातील कम्युनिस्ट क्रांती संपून सोव्हिएत संघाचे विभाजन झाले, देश अराजकाकडे गेला.