सुधारित...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:22 AM2020-12-29T04:22:40+5:302020-12-29T04:22:40+5:30
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ए. वाय. पाटील यांचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ताकदीने उतरून गावा-गावांत राष्ट्रवादीचा झेंडा ...
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ए. वाय. पाटील यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ताकदीने उतरून गावा-गावांत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.
ग्रामपंचायत निवडणूक व विविध सेलच्या कार्यकारिणीचा सोमवारी आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ए. वाय. पाटील म्हणाले, स्थानिक विकासाच्यादृष्टीने ग्रामपंचायतीमधील सत्ता महत्त्वाची असते. पक्ष तळागाळापर्यंत बळकट करण्यासाठी पक्षाचे जास्तीत जास्त सरपंच, उपसरपंच व सदस्य झाले पाहिजेत. स्थानिक पातळीवर सोयीनुसार काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची आघाडी करा, मात्र कोणत्याही परिस्थितीत गावा-गावांत पक्षाचा झेंडा फडकवला पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ सेल असून, त्याची कार्यकारिणी पूर्ण करण्याच्या सूचना प्रदेश राष्ट्रवादीकडून आल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे म्हणाले, कार्यकारिणी करण्यासाठी तीन बैठका घेऊन सूचना केल्या, तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. छत्रपती शिवरायांचे मावळे स्वराज्यासाठी राबायचे, स्वार्थासाठी नाही. त्याप्रमाणे काम करा.
जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, डी. बी. पिष्टे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष राेहित पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, प्रविता सालपे, कृष्णात पुजारी, शिवाजी देसाई, संभाजी पाटील, पंडितराव केणे, प्रा. किसन चौगले, नेताजी पाटील, आदी उपस्थित होते.
संतोष मेंगाणे यांनी आभार मानले.
...तर करेक्ट कार्यक्रम हाेईल
सत्तेची सूज आली म्हणून पक्षाचे काम केले नाही तरी चालते, या अविर्भावात कोणी राहू नये. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कडक शिस्तीचे आहेत. तुम्ही काय करता, याचा लेखाजोखा त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने योग्यवेळी ते करेक्ट कार्यक्रम करतील, असा इशारा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी दिला.
फोटो ओळी :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या सोमवारी आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोहित पाटील, अनिल साळोखे, भैया माने आदी उपस्थित होते. (फोटो-२८१२२०२०-कोल - एनसीपी) (छाया - नसीर अत्तार)