मोका कारवाईतील ईराणी गॅंगचा मोहमद अलीच्या मुसक्या आवळल्या, चार वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:02 PM2022-02-02T14:02:03+5:302022-02-02T14:26:19+5:30
ईराणी गॅंगमधील तिघे अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
कोल्हापूर : वडगाव येथील मोकांतर्गत कारवाईनंतर गेले चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ईराणी गॅंगचा फरारी गुंड मोहम्मद शौकत अली उर्फ इराणी (वय ४४ रा. चिंद्री रोड, हुसनी कॉलनी, गांधी गुंज बिदर, रा. कर्नाटक) याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेने आवळल्या. तो बिदर रेल्वे स्टेशन (रा. कर्नाटक) येथे वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला मंगळवारी सायंकाळी अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव पोलीस ठाण्यात ईराणी गॅंगला मोका लावला होता. त्यातील चौघे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होते. त्यापैकी मोहम्मद शौकत अली उर्फ ईराणी हा गुन्हेगार बिदर रेल्वे स्टेशन (रा. कर्नाटक) येथे वावरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस नाईक आसीफ कलायगार यांना मिळाली.
त्यानुसार कर्नाटकात खास पोलिसांचे पथक पाठवून मंगळवारी सायंकाळी त्याला अटक केली. ईराणी गॅंगमधील तिघे अद्याप फरारी आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव यांनी मोहमद अली उर्फ ईराणी याला अटकेची कारवाई केली.
त्याला वडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजणे हे तपास करत आहेत.