मोहिनी अस्त्र अन् मुरब्बी चंद्रकांतदादा !
By Admin | Published: October 3, 2016 12:52 AM2016-10-03T00:52:04+5:302016-10-03T00:52:04+5:30
कागलमधील कार्यक्रम : दादा मुख्यमंत्री होणार : मंडलिक, मुश्रीफांचे भाकीत
जहाँगीर शेख ल्ल कागल
श्री शिवाजी सहकारी सेवा सोसायटीच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ, प्रा. संजय मंडलिक, समरजितसिंह घाटगे ही राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर आली. अपेक्षेप्रमाणे प्रत्येकाने राजकीय कोट्या केल्या. कागलच्या राजकीय विद्यापीठाला परिचित असणाऱ्या कौतुकाच्या राजकीय मोहिनी अस्त्राचा वापर प्रामुख्याने मुश्रीफ-मंडलिकांनी केला. मात्र अत्यंत स्थिरप्रज्ञ राहात चंद्रकांतदादांनी आपल्यातील मुरब्बी राजकारण्याचे दर्शन या विद्यापीठाला घडविले.
मुळात पालकमंत्री पाटील आणि माजी मंत्री मुश्रीफ हे एका व्यासपीठावर येणार, तेही कागलमध्ये आणि सोबतीला मंडलिक-घाटगे असणार हाच राजकीय चर्चेचा विषय होता. कागलच्या आताच्या आणि यापूर्वीच्या राजकीय नेत्यांनी मान्यवर आणि ताकदवान नेत्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत, आणि त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगत, अनेकांना अक्षरश: गुंडाळलेले आहे. चंद्रकांतदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी या विषयाला धरून ‘मोहिनी अस्त्राची’ पहिली सुरुवात प्रा. मंडलिकांनी केली. दादा दोन चार दिवसांत मुख्यमंत्री होतात का? अशी परिस्थिती दिसत आहे. यापूर्वी मंडलिकसाहेब, खानविलकर, मुश्रीफसाहेब मंत्री झाले, पण दोन नंबरचे महसूलमंत्री, बांधकाममंत्री अशी खाती फक्त दादांनाच लाभली आहेत. समरजितसिंह घाटगेंनी शाहू साखर कारखाना बिनविरोध करण्याचे श्रेय नेत्यांना देत आमच्यासाठी चंद्रकातदादा आजही सहकारमंत्री आहेत. सहकारी संस्था जपण्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवतो, अशी राजकीय विद्यापीठाची महतीही सांगितली. आमदार मुश्रीफांनी सांगितले की, माझ्या वडिलांनी लहानपणी दत्तम भट्टाला माझी कुंडली विचारली होती. तेव्हा भटजीने सांगितले होते की, हा शिकेल की नाही हे माहीत नाही, पण मंत्री जरुर होईल. ‘दादा’ तुम्ही कुंडलीत बघा. मुख्यमंत्रिपद जरूर असावे, असे दिसते. अडीच तीन वर्षांपूर्वी कोणाला वाटले होते का? की चंद्रकांतदादा इतके वजनदार मंत्री असतील! दादा मुख्यमंत्री व्हावेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र या मोहिनी अस्त्राचा कोणताही इफेक्ट न होऊ देता राज्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला,मंत्र्याला साजेसे विकासात्मक धोरणात्मक भाषण करीत मुरब्बी राजकारण्यांचे दर्शन घडविले, आणि जाता जाता इशारा देत म्हणाले, चांगल्या कामासाठी जरूर एकत्र येऊ पण निवडणूक ही निवडणूकच असते.