पंचगंगा प्रदूषित करणारे घटक मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:54+5:302020-12-26T04:18:54+5:30
पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न गणपती कोळी : कुरुंदवाड-तेरवाड (ता. शिरोळ) पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण ...
पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न
गणपती कोळी : कुरुंदवाड-तेरवाड (ता. शिरोळ) पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याचा पंचनामा करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी यांना बांधून घातल्याप्रकरणी पाच आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगाकाठच्या नागरिकांतून खदखद व्यक्त होत आहे. नदी प्रदूषित करून लाखो लोकांच्या जिवाशी खेळणारे घटक मोकाट आहेत. उलट न्यायासाठी प्रसंगी कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. कारवाईची इतकी तत्परता प्रदूषण करणाऱ्या घटकांवर दाखविल्यास पंचगंगा नदी निश्चितच प्रदूषणमुक्त होईल. पंचगंगा नदी प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील २२ गावांबरोबर कृष्णा नदीलाही बसतो आहे. प्रदूषण मुक्तीसाठी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पंचगंगा काठावरील सामाजिक कार्यकर्ते वारंवार आंदोलन करीत असतात. या आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ जुजबी कारवाई करून एक प्रकारे नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांना अभय देत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो एकर शेती नापीक तर बनली आहेच; शिवाय अनेक नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. याच संतापातून सामाजिक कार्यकर्त्यांकडून नदी प्रदूषणाविरोधात जबाबदार अधिकाऱ्यांवर तीव्र भावना व्यक्त केली जाते. त्यामुळे बुधवारी (दि. २३) दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना नदी प्रदूषण रोखण्यात हलगर्जीपणा दाखविल्याच्या रागातून आंदोलकांनी काही काळासाठी बंधाऱ्यावर बांधून ठेवले. त्यामुळे कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली. अशी तत्परता नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर दाखविली तर नक्कीच नदी प्रदूषणमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.