लक्षतीर्थमधील केदार घुरके गँगच्या दहा गुंडाना मोक्का

By उद्धव गोडसे | Published: August 30, 2023 09:39 PM2023-08-30T21:39:39+5:302023-08-30T21:40:18+5:30

आयजींची प्रस्तावास मंजुरी : गुन्हेगारी कृत्यांतून दहशतीचा प्रयत्न

Mokka on Ten criminals of Kedar Ghurke Gang | लक्षतीर्थमधील केदार घुरके गँगच्या दहा गुंडाना मोक्का

लक्षतीर्थमधील केदार घुरके गँगच्या दहा गुंडाना मोक्का

googlenewsNext

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत आणि फुलेवाडी परिसरात गुन्हेगारी कृत्यांमधून दहशत निर्माण करणाऱ्या केदार घुरके गँगवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली. घुरके टोळीवर २५ गुन्हे दाखल असून, टोळीने मे २०२३ मध्ये विरोधी टोळीचा प्रमुख प्रकाश बबन बोडके याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्या गुन्ह्यातील दहा हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे.

केदार भागोजी घुरके (वय २४), राजू सोनबा बोडके (वय ३२), युवराज राजू शेळके (वय २१), कृष्णात कोंडीराम बोडेकर (वय २७), करण राजू शेळके (वय १९), राहुल सर्जेराव हेगडे (वय २४), चिक्या उर्फ विकास बंडोपंत भिउंगडे (वय ३२, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), तानाजी धोंडीराम कोळपटे (वय २६), सत्यजित भागोजी फाले (वय १९) आणि राजू मधू बोडेकर (वय ३०, तिघे रा. फुलेवाडी, रिंगरोड, कोल्हापूर) अशी कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

सराईत गुन्हेगार संतोष सोनबा बोडके याला पोलिसांनी मार्च २०२३ मध्ये पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबद्ध केल्यानंतर त्याच्या टोळीची सूत्रे केदार घुरके याने स्वीकारली होती. त्याच्या टोळीने ३१ मे २०२३ रोजी दुपारी शिवाजी पेठेतील अर्ध शिवाजी पुतळा परिसरात प्रकाश घोडके याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. सुदैवाने त्या हल्ल्यात बोडके बचावला. जुना राजवाडा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून घुरके टोळीतील दहा संशयितांना अटक केली.

या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार तयार झालेला प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांच्याकडे पाठवला होता. फुलारी यांनी त्यात आणखी काही सुधारणा करून प्रस्तावास मंजुरी दिली. पुढील तपास शहर उपअधीक्षक अजित टिके करीत आहेत.

Web Title: Mokka on Ten criminals of Kedar Ghurke Gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.