Kolhapur: कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:32 PM2024-06-25T12:32:33+5:302024-06-25T12:32:50+5:30

कारागृह प्रशासन हडबडले

Mokka prisoners attack prison officials in Kalamba Jail Kolhapur | Kolhapur: कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला

Kolhapur: कळंबा कारागृहात मोक्कातील कैद्यांचा तुरुंगाधिकाऱ्यांवर हल्ला

कोल्हापूर : नातेवाइकांच्या भेटीसाठी मुलाखत कक्षात घेऊन जाण्यासाठी वेळ केल्याच्या रागातून अतिसुरक्षित अंडा सेलमधील मोक्काचा आरोपी कैदी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याने कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील यांच्यावर हल्ला केला. तुरुंगाधिकारी यांच्याकडून काठी हिसकावून अंगावर धावून जाऊन अर्वाच्य शिवीगाळ करून त्यांना मारहाण केली. सोमवारी दुपारी १२ वाजून दहा मिनिटांनी हा प्रकार कळंबा मध्यवर्ती कारागृहात घडला. अचानक झालेल्या प्रकाराने कळंबा कारागृहाचे प्रशासन हडबडले.

दरम्यान, याप्रकरणी तुरुंगाधिकारी पाटील (वय ५०, रा. अधिकारी निवासस्थान, कळंबा मध्यवर्ती कारागृह) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. काळभोर याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, काळभोर हा मोक्कातील आरोपी आहे. गेली चार वर्षे तो कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याला दुपारी १२ वाजता त्याचे नातेवाइकांच्या भेटीसाठी तुरुंगाधिकारी पाटील घेऊन जात होते. त्यावेळी भेटीसाठी उशिरा का केला, कारणावरून तो संतप्त झाला. यावेळी कैदी काळभोर याने पाटील यांना पाहून अर्वाच्य शिवीगाळ केली. तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली. त्याला भेटीसाठी घेऊन जात असताना अति सुरक्षा विभागाच्या बाहेर तुरंगाधिकारी पाटील यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली.

अचानक झालेल्या प्रकारामुळे पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी हडबडले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन काळभोर याला ताब्यात घेऊन कोठडीत डांबले. घडलेला हा प्रकार त्यांनी कारागृहाचे प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांना सांगितला. त्यानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला. दरम्यान, न्यायालयाच्या परवानगीने काळभोरला तपासासाठी ताब्यात घेतले जाणार आहे. पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे तपास करीत आहेत.

काळभोर तापट स्वभावाचा

गेल्या चार वर्षांपासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. तो तापट स्वभावाचा आहे. त्याने अनेकदा किरकोळ कारणावरून अन्य कैद्यांची वाद घातला आहे.

Web Title: Mokka prisoners attack prison officials in Kalamba Jail Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.