गुढी पाडव्यानंतरच माघारीला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:23 AM2021-04-10T04:23:41+5:302021-04-10T04:23:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची माघारीची गती कमी आहे. शुक्रवारी पद्मजा रवींद्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची माघारीची गती कमी आहे. शुक्रवारी पद्मजा रवींद्र आपटे यांनी आपला सर्वसाधारण गटातील अर्ज मागे घेतला. गुढीपाडव्यानंतरच माघारीसाठी प्रयत्न होणार आहेत. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे.
‘गोकुळ’च्या २१ जागांसाठी ४८२ अर्ज दाखल झाले होते. त्यातील ७५ जणांचे ९२ अर्ज अवैध ठरले तर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध आहेत. या अर्जांची मंगळवारपासून माघारीस सुरूवात झाली असून गेल्या चार दिवसात केवळ तिघांनी माघार घेतली. यामध्ये ज्येष्ठ संचालक अरूण नरके, स्निग्धा नरके यांच्यानंतर शुक्रवारी विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या पत्नी पद्मजा आपटे यांनी माघार घेतली.
येत्या साधारणता मंगळवार (दि. १३) पासून पॅनेल बांधणीस गती येणार असून त्यानंतरच नेत्यांच्या आदेशानुसार माघारीस सुरूवात होईल. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून २ मे रोजी मतदान होणार आहे.
दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेल्या पंधरा जणांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) सुनील शिरापूरकर यांच्याकडे दाद मागितली आहे. यावर १५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.