सोमवारसाठी : राजकारणातील भला माणूस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:21 AM2020-12-26T04:21:09+5:302020-12-26T04:21:09+5:30

राजकारणातील भला माणूस... कोल्हापूर जिल्ह्याचे खमके नेतृत्व श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज, सोमवारी (दि. २८) ...

For Monday: Good man in politics ... | सोमवारसाठी : राजकारणातील भला माणूस...

सोमवारसाठी : राजकारणातील भला माणूस...

Next

राजकारणातील भला माणूस...

कोल्हापूर जिल्ह्याचे खमके नेतृत्व श्रीपतराव शंकरराव बोंद्रे दादा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज, सोमवारी (दि. २८) होत आहे. त्यानिमित्त दादांच्या लोककल्याणकारी कार्यावर दृष्टिक्षेप...

कुन्नूर (ता. चिक्कोडी) येथील गरीब शेतकरी कुटुंबात २८ डिसेंबर १९२० ला जन्मलेल्या श्रीपतराव बोंद्रे दादांनी आपल्या कर्तृत्वाने यशाची अनेक शिखरे पार करीत नवनवे मानदंड निर्माण केले. लौकिकार्थाने श्रीपतराव बोंद्रेदादा यांचे जीवन निर्विवादपणे यशस्वी ठरले. आज जरी त्यांची आठवण जाणते राजकारणी किंवा समाजकारणी म्हणून होत असली तरी हा प्रवास सहकाराच्या जाणिवेतून सुरू झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात सहकाराची बीजे रुजली जात होती व त्यांनी अर्बन बँकेच्या माध्यमातून लोकसेवेचा वसा घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय खूप महत्त्वाचा होता; कारण बँकेच्या माध्यमातून सामान्य माणसांशी संबंध येत राहिला. याच काळात स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीशीही त्यांचा संबंध आला. यातून समाजातील प्रत्येक घटक समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराच्या माध्यमातून कामाचे क्षेत्र अधिक व्यापक झाले. त्यांनी जिल्ह्याच्या स्तरावर बँकेमध्ये प्रवेश केला. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. या काळात शेती व शेतीसंबंधाने अनेक योजनांचा पाठपुरावा केला. या काळात ‘नेतृत्व’ या अर्थाने बोंद्रेदादा यांच्या कर्तृत्वाचा परीघ विस्तारत होता. नव्या योजना मांडणे व त्यांची अंमलबजावणी करण्यासंबंधाने आराखडे तयार करणे ही त्यांची खासियत बनली. त्यातूनच पुढील काळात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे ‘गोकुळ’ व रयत तालुका संघ या संस्थांची उभारणी झाली. दादांच्या विचार व कृतीची प्रतीके बनलेल्या या संस्था सहकारातील आदर्श संस्था मानल्या जातात. याचे श्रेय निश्चितपणे त्यांच्या दूरदृष्टीला द्यायला हवे.

समाजकारण आणि राजकारण एकमेकांच्या आधाराने व्हायला हवे, या मताचा पुरस्कार दादांनी नेहमीच केला; पण असे करताना समाजकारणाचे स्थान नेहमीच अव्वल असायला हवे, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे समाजाचा विचार प्रत्यक्षात उतरवायचा असेल तर राजकीय ताकद आपल्याकडे असायला हवी, हा प्रबळ विचार त्यांच्या मनात येत राहिला. लोकांचा पाठिंबा, जनमानसातील प्रतिमा व विचारांतील स्पष्टता या बळावर त्यांनी कोल्हापूर नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केले. येथे एक बाब लक्षात घ्यावयास हवी की, १९६०च्या दशकात कोल्हापूर शहर व परिसरात डाव्या विचारांचे प्राबल्य होते. अशा काळात त्यांनी काँग्रेस पक्षाचे यशस्वी प्रतिनिधित्व केले. सभागृहात काँग्रेसचे एकमेव सदस्य असताना नगराध्यक्ष बनण्याचा पराक्रम केला. राजकीय कारकिर्दीची ही सुरुवात पुढील काळात अखंडितपणे सुरू राहिली. एकवेळचा १९६७ अपवाद करता, त्यांनी सातत्याने २३ वर्षे करवीर व सांगरूळ मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. पुलोद आघाडी सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री पदाची जबाबदारीही तितक्याच सक्षमपणे सांभाळली.

दीर्घकाळ राजकीय सत्तास्थानावर राहूनही त्यांनी कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. उपलब्ध निधी व साधनांचा अधिकाधिक वापर करीत आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याचा ध्यास ठेवला. त्यामुळेच आजही त्यांच्या कर्तृत्वाची दखल अत्यंत आदराने घेण्यात येते. अर्थात हे यश एकट्याचे नाही याची सततची जाणीव त्यांच्या मनात असायची. मी माझ्या कार्यकर्त्यांमुळे असल्याची विनम्र भावना त्यांनी वेळोवेळी व्यक्त केल्याचे आजही त्यांचे कार्यकर्ते सांगतात. त्यांच्या कार्यकर्त्यांची दुसरी फळी अत्यंत सक्षम होती. वेगवेगळ्या जातिधर्माच्या लोकांची मोट बांधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात त्यांना फारसे कष्ट करावे लागत नसत; कारण त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, सेवा संस्था, दूध संस्था अशा माध्यमांतून लोकांशी जोडलेला संबंध घट्ट असायचा. मतदार संघांवर त्यांची कमालीची मांड होती. काम करण्याची विशिष्ट पद्धत असल्यामुळे कोणत्याही स्तरावरील व्यक्तीचा संबंध येत राहायचा. मतदार संघातील प्रत्येक गावातील लोकांना ते नावानिशी ओळखत असत. त्यामुळे त्यांची लोकमानसातील प्रतिमा ‘आपले दादा’ अशीच होती. कोल्हापुरात असताना सहज उपलब्ध होणारे राजकीय नेतृत्व म्हणूनही त्यांचा सार्थ गौरव होत असे. या सर्व सकारात्मक बाबींचा परिणाम होऊन त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभावी नेतृत्व केले. जिल्ह्याच्या संदर्भात होणारा निर्णय त्यांच्या संमतीशिवाय कधीच झाला नाही. त्यांनी राजकीय प्रतिमा नेहमीच स्वच्छ ठेवली. शेतकरी, कष्टकरी जनतेचा आवाज म्हणूनच त्यांनी कार्य केल्यामुळे ‘राजकीय वातावरणातील भला माणूस’ अशी सार्थ ओळख कार्यातून निर्माण केली.

प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर

फोटो : २५१२२०२०-कोल-बोंद्रेदादा

Web Title: For Monday: Good man in politics ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.