कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गायब, तक्रारींसाठी बँकेत गर्दी, लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 11:39 AM2021-12-25T11:39:58+5:302021-12-25T11:40:24+5:30
शहराच्या व्यापारी पेठेतील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर अचानक पैसे काढल्याचे संदेश आले. त्यामुळे एटीएमचा वापर अथवा कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याचे समजल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले.
कोल्हापूर : शहराच्या व्यापारी पेठेतील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर अचानक पैसे काढल्याचे संदेश आले. त्यामुळे एटीएमचा वापर अथवा कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याचे समजल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले. त्यामुळे शुक्रवारी एटीएम कार्ड ब्लाॅक करण्यापासून ते सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार देण्यासाठी दिवसभर धावपळ झाली. गेल्या महिनाभरापासून अशा प्रकारे शहरातील विविध बँकांमधील ग्राहकांना भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खात्यावरून पैसे गेल्याचे ज्यांना मेसेज आले त्या खातेदारांनी बँकेच्या शाहुपुरीतील शाखेत गर्दी केली. एका खातेदारास सकाळी सात वाजता पैसे काढल्याचा मेसेज आला. त्यांच्या खात्यावर १२ हजार ५०० रुपये होते. त्यातील १२ हजार रुपये काढले, त्यामुळे तो खातेदार हवालदिल झाला. एटीएम सेंटरमधून पैसे अथवा कोणत्याही ठिकाणी पासवर्ड किंवा ओटीपीचा वापर करून व्यवहार केलेले नाहीत. तरीसुद्धा खात्यावरचे पैसे परस्पर कसे काय कुणी काढले आहे, अशी विचारणा खातेदारांनी केली.
त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतची रीतसर सायबर ठाण्याकडे तक्रार देण्याची सूचना ग्राहकांना केली. त्याची एक प्रत व असा प्रकार घडल्याचा अर्ज देण्यास सांगितले. बँक अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहकांना हा प्रकार म्हणजे एटीएम कार्ड क्लोनिंग करून केल्याचा संशय व्यक्त केला. या प्रकारावरून ग्राहकांनी आमचे एटीएम कार्ड ब्लाॅक करण्याची विनंती केली. त्यानुसार बँकेनेही अशी कार्डे तात्पुरती ब्लाॅक केली. त्यानंतर अनेक ग्राहकांनी सायबर पोलीस ठाण्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली. दुपारपर्यंत दोन तक्रारी सायबर सेलकडे दाखल झाल्या होत्या.
बँक म्हणते एफआयआर नोंद करा..
हा प्रकार एटीएम मशीनमध्ये क्लोनिंग डिव्हाईस बसवून भामट्यांनी एटीएम कार्डचे क्लोनिंग अथवा एखाद्या ठिकाणी वस्तू खरेदी केल्यानंतर पाॅझ मशीनमध्येही क्लोनिंग डिव्हाईस बसवून अशी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपला पासवर्ड किमान ८ ते १५ दिवसांच्या कालावधीमध्ये बदलावा, अशा प्रकारे फसवणूक झाल्यानंतर सायबर पोलीस ठाणे अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात रीतसर एफआयआर दाखल करून संबंधित रकमेची बँकेकडे मागणी करावी. अशा रक्कमेचा विमा बँकेने उतरविलेला असतो. त्यामुळे ही रक्कम ६० दिवसांत संबंधित खातेदाराच्या खात्यात जमा केली जाते, अशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.