वधू दाखवतो असे सांगून पैसे उकळणारे रॅकेट, कोल्हापुरातील तरुणांची फसवणूक
By भीमगोंड देसाई | Published: March 31, 2023 12:03 PM2023-03-31T12:03:57+5:302023-03-31T12:04:19+5:30
अब्रू जाईल म्हणून तक्रार नाही
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील अनाथाश्रमात सुंदर मुलींचे स्थळ असल्याचे खोटे सांगून विवाहेच्छुकांकडून पाच हजार रुपये उकळण्याचे रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे पुढे येत आहे. समाजमाध्यमातून लग्नासाठी मुली पाहणाऱ्या तरुणांना जाळ्यात ओढायचे आणि पैसे गोळा करायचे, असा जोरदार धंदा सुरू आहे. यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील अनेक तरुण फसले आहेत.
शाहूवाडीत एक आश्रम आहे. तेथील आश्रमात मुलगी पाहायला जाण्यासाठी पाच हजार रुपये फी आहे, असे सांगून फसवणूक केली जात आहे. यासाठी समाजमाध्यमावर ‘अनाथ आश्रम विवाह’ या नावाने पेज तयार करून मुली पाहणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचले जात आहे. या पेजवरील मोबाइल नंबरवर संपर्क साधल्यानंतर महिला बोलते. ती शाहूवाडीतील अनाथाश्रमात मुली आहेत. तुम्हाला मुलगी पाहण्यासाठी यायचे असेल तर पाच हजार रुपये फी भरावी लागेल, असे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित तरुणाच्या व्हाॅट्सॲपवर सुंदर मुलीचा फोटो, तिचा बायोडेटा पाठविला जातो.
फोटोमध्ये मुलगी सुुंदर दिसल्यानंतर तरुण तातडीने मुलगी पसंत आहे, असा संदेश व्हाॅट्सॲपवर पाठवतो. त्यानंतर मुलगी पाहण्यासाठी कधी येऊ, हे विचारण्यासाठी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर मोबाइल रिसीव्ह न करता मेसेज आणि व्हाॅट्सॲपवर चॅटिंग केले जाते. प्रत्यक्ष मुलगी पाहण्यासाठी यायचे असेल तर काय प्रक्रिया आहे, याची यादीच तरुणाच्या व्हाॅट्सॲप नंबरवर पाठविली जाते. यादीत पहिल्यांदा पाच हजार रुपये फी भरावी लागते, या बदल्यात आम्ही तुमच्या घरी येतो, घरदार बघतो, मुलीला साडी-चोळी घेतो, त्यानंतर तुमच्या नावाची नोंदणी करतो, आश्रमातील मुलगी पाहायला जाण्यासाठी गेटपास देतो, असा आशय आहे. पण हा फसवणुकीचा फंडा असल्याचे समोर आले आहे.
अंबाबाई मंदिर परिसराचेही नाव
भूलथापांना भुलून अनेक तरुण पाच हजार रुपये भरून मुलगी पाहण्यासाठी म्हणून शाहूवाडीत जात आहेत. पण ते ज्या आश्रमाचे नाव सांगतात, त्या नावाचा आश्रमच शाहूवाडीत नाही. त्यामुळे हे तरुण हताश होऊन दिवसभर शाहूवाडीत आश्रम शोधतात. सुरुवातीला पाठविलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून शाहूवाडीत तुम्ही सांगितलेला आश्रम नाही, असे सांगताच कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात असल्याचे सांगितले जातेे. यानंतर तरुण अंबाबाई मंदिरात शोध घेतात. तिथेही आश्रम नसल्याने पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यावेळी जयसिंगपूरला आश्रम आहे, तिथे जा, असे सांगितले जाते. तिथे गेल्यानंतरही आश्रम सापडत नाही. त्यानंतर संबंधित तरुणाला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटते.
अब्रू जाईल म्हणून तक्रार नाही
यात फसलेला तरुण निराश होऊन आपलीच अब्रू जाईल, या भीतीपोटी पोलिसात तक्रारही देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे फसवणुकीचे रॅकेट उघड होत नाही. फसवणुकीचा हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरूच आहे.
आश्रमातील उपक्रमांचेही फोटो
शाहूवाडीत अनाथाश्रम असल्याची खात्री पटण्यासाठी तेथील एका इमारतीचा फोटो, महाराष्ट्र शासन असे लिहिलेले संस्थापकाचे व्हिजिटिंग कार्ड, आश्रमातील मुला-मुलींच्या उपक्रमांचे फोटो पाठविले जातात. फसवणुकीसाठी ज्या आश्रमाचे नाव सांगितले जाते, तो आश्रमच शाहूवाडीत कोठेही नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
शाहूवाडीत महिला व बालकल्याण विभागाचा कोणताही अनाथआश्रम मंजूर नाही. महिला बालकल्याण विभागाकडील संस्था ० ते १८ वर्षाखालील वयोगटातील मुला- मुलींसाठी असतात. - शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद कोल्हापूर.