पैसे, दमदाटीवर यंत्रणा चालते- कोल्हापूर पाणीपुरवठ्याच्या बैठकीत आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:13 PM2019-04-04T17:13:54+5:302019-04-04T17:18:55+5:30
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा ही पैसे आणि दमदाटीवर चालत असल्याचा गंभीर आरोप गुरुवारी झालेल्या महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्या बैठकीत झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सांगूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा ही पैसे आणि दमदाटीवर चालत असल्याचा गंभीर आरोप गुरुवारी झालेल्या महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्या बैठकीत झाला. गेल्या अनेक वर्षांपासून सांगूनही पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारत नसल्याचा निषेध जल अभियंता सुरेश कुलकर्णी यांना गुलाबाची फुले देऊन करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या. येत्या आठ दिवसांत महापालिकेची सभा बोलाविण्याचा निर्णय यावेळी झाला.
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात प्रशासनाने काय धोरण ठरविले आहे, याबाबत चर्चा करण्याकरिता महापौर मोरे यांनी ही बैठक आयोजित केली होती. बैठकीत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तीन वर्षांपासून गळती काढण्याचे काम तसेच लोकांना पाणी देण्याचे नियोजन करता येत नसेल तर जल अभियंता कुलकर्णी यांनी आपला कार्यभार सोडून द्यावा, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार थांबविले जावेत, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या.
पाण्यासंदर्भात वारंवार बैठका घेऊनही काही होत नसल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत राहुल चव्हाण यांनी गेल्या महिन्यापासून शाहूपुरी परिसरात पाणी येत नाही. नागरिक आम्हाला स्वस्थ बसून देत नाहीत. तेव्हा यापुढे वेळेवर आणि नियोजनाप्रमाणे पाणी मिळाले नाही तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा दिला.
उपमहापौर भूपाल शेटे यांनी जलअभियंता कुलकर्णी यांना जबाबदार धरले. गेल्या तीन वर्षांपासून ३५ ते ४० ठिकाणी गळती आहे म्हणून सांगितले जाते. आयुक्त बदलले की त्यांच्या घरातील फर्निचर बदलले जाते. मात्र पाण्यासंदर्भात काही कामे निघाली की तितक्या तातडीने ती के ली जात नाहीत, अशी तक्रार केली.
एका भागात पाणी भरपूर येत असेल तर त्याच्या शेजारील भागात मात्र लोकांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार करीत सुरेखा शहा यांनी लोणार वसाहत, मार्केट यार्ड, महाडिक वसाहत, बापट कॅम्प परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत असून जर त्यात सुधारणा झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
टाकीत पाणीच नाही; मग पैसे का दिले?
मार्केट यार्ड येथील नवीन बांधलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी पडत नाही. मुळात टाकी चुकीच्या ठिकाणी बांधली आहे. तरीही टाकीच्या कामाचे २५ लाख रुपये ठेकेदाराला दिले आहेत, असे सांगताना जर कामच चुकीचे केले असेल तर ठेकेदाराचे पैसे का दिले? अशी विचारणा भूपाल शेटे यांनी केली. जनतेच्या सोईसाठी काम करता की पैशांसाठी काम करता? अशी विचारणाही त्यांनी केली.
काय सांगायचंय ते ठरलंय
पूजा नाईकनवरे यांनी कुलकर्णी यांना धारेवर धरले. शाहूपुरीतील पाण्याच्या टाकीत पाणी पडलेले नाही. चौदा इंची जलवाहिनी टाकायची होती तेथे आठ इंची टाकण्यात आली ती कोणाला विचारून टाकली, अशी विचारणा त्यांनी केली. कोणा नगरसेवकांना काय उत्तरे द्यायची हे अधिकाºयांनी ठरवून टाकलेय. तीन वर्षे केवळ पाण्याच्या नियोजनावर चर्चा करतो; पण अधिकारी काहीच करीत नाहीत. काय केले तीन वर्र्षांत एकदा सांगा, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
यावेळी झालेल्या चर्चेत सूरमंजिरी लाटकर, उमा बनछोडे, गीता गुरव, अश्विनी बारामते, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर, विजयराव सूर्यवंशी, प्रा. जयंत पाटील, सचिन पाटील, विजय खाडे, राजसिंह शेळके, आदींनी भाग घेतला.
------------------------------------------------------------------
फोटो केएमसी मीटिंग या नावाने देत आहे - भारत चव्हाण