सायकलसाठी साठवलेले पैसे कोविड सेंटरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:10+5:302021-06-28T04:18:10+5:30
सदाशिव मोरे। आजरा : शाळा सुरू नाहीत, आईवडिलांसोबत शेताकडे जायचे. त्यांना मदत करायची व त्यांच्याकडून सायकलसाठी पैसे घ्यायचे अमेयचा ...
सदाशिव मोरे। आजरा : शाळा सुरू नाहीत, आईवडिलांसोबत शेताकडे जायचे. त्यांना मदत करायची व त्यांच्याकडून सायकलसाठी पैसे घ्यायचे अमेयचा हा दिनक्रम गेले वर्षभर सुरू होता. मात्र सायकलसाठीच गल्ल्यात साठविलेले पैसे आपल्याच वाढदिवसादिवशी मुमेवाडीच्या कोविड सेंटरला देवून दुसरीत शिकणा-या अमेय अमोल बांबरे या मुलाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गल्ल्यातील पैशापेक्षा अमेयच्या मनात आलेले विचार लाखमोलाचे आहेत.
मनात सायकल घेण्याची आस होती. मात्र, गल्यात पैसे जमा करून व आईवडिलांना मदत करून आपल्याच पैशाने सायकल घेण्याची खूणगाठ अमेयने बांधली. पहिलीत शिकत असल्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. शाळा बंद झाली. घरीच आई-वडिलांच्या मदतीने अक्षरे गिरवली. सकाळपासून आईवडिलांना प्रत्येक कामात मदत केली.
आईवडिलांसह नातेवाईकांनी दिलेले पैसे गल्यात जपून ठेवले जमा झालेल्या पैशातून वाढदिवसादिवशी सायकल घ्यायची, असे आईवडिलांना सांगितले. मात्र वाढदिवसाच्या अगोदरच्या दिवशी अमेयने आईवडिलांना गल्यात जमा झालेले पैसे मुमेवाडीतील कोविड सेंटरला देणार असल्याचे सांगून धक्काच दिला.
मुमेवाडीत मुकुंददादा आपटे फाउंडेशनच्यावतीने जि. प. सदस्य उमेश आपटे कोविड सेंटर सेवाभावी वृत्तीने चालविताना. या सेंटरबद्दल घरात दररोज चर्चा व्हायची. दररोज अमेय वडिलांना उमेश आपटे डॉक्टर आहेत का? मला त्यांना भेटायचे आहे. ते डॉक्टर आहेत की देव आहेत. याची मला माहिती पाहिजे आणि तेही आपल्या वाढदिवसादिवशीच सेंटरला जायचं असा वडिलांपुढे आग्रह धरला आणि अमेयने आपल्या गल्यातील पैसे कोविड सेंटरला उमेश आपटे यांच्याकडे सुपूर्द केले. अमेयने कधीही हट्ट धरला नाही. जि. प. सदस्य उमेश आपटे कोविड सेंटरमध्ये करत असलेले काम व रुग्णांची सेवा ऐकून त्या ठिकाणी गल्ल्यात साठविलेले पैसे देण्याचा निर्धार केला याचा मला सार्थ अभिमान आहे, असे वडील अमोल भामरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
फोटो ओळी - सायकलसाठी साठवलेले पैसे मुमेवाडीच्या कोविड सेंटरला उमेश आपटे यांच्याकडे देताना अमेय बांबरे. शेजारी वडील अमोल बांबरे.
क्रमांक : २७०६२०२१-गड-०९