दोन्ही उमेदवारांकडून तीसजणांनी घेतले पैसे!
By Admin | Published: December 31, 2015 11:44 PM2015-12-31T23:44:35+5:302015-12-31T23:57:12+5:30
वसुली होणार : कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतील प्रकार
कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ज्यांनी दोन्हींकडून पैसे घेऊन एका उमेदवाराची फसवणूक केली, अशा तीस मतदारांवर दोन्ही उमेदवारांनी लक्ष केंद्रित केल्याचे समजते. त्यांच्याकडून ज्यांना त्या मतदारांना मतदान केलेले नाही, त्याचे पैसे परत द्यावेत, असा दबाव आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या निवडणुकीत ३८२ मतदार होते. त्यापैकी सतेज पाटील यांनी २३५ मतदारांना सहलीवर नेले होते. उर्वरित १४७ पैकी काहीजण सहलीवर गेले नव्हते व सुमारे शंभराहून अधिक मतदारांना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सहलीवर नेले होते. प्रत्यक्ष निकालात सतेज पाटील यांना २२० मते मिळाली व महाडिक यांना १५७ मते मिळाली. याचा अर्थ सतेज यांच्याकडील किमान पंधरा मतदारांनी महाडिक यांना मतदान केले आहे. या दोघा उमेदवारांकडून पैसे घेतले; परंतु एकालाच मतदान केले असे किमान तीस मतदार असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आता वसुलीची मोहीम तीव्र करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्यांनी दोघांकडून पैसे घेऊन सतेज पाटील यांना मतदान केले, त्यांनी महाडिक यांचे पैसे परत द्यावेत व ज्यांनी महाडिक यांना मतदान केले त्यांनी सतेज पाटील यांचे पैसे परत द्यावेत, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. निकालानंतर आता हे वसुलीचे कवित्व सुरू झाले आहे. गडहिंग्लज परिसरात दुसरीच एक चर्चा सुरू आहे. त्या परिसरातील एका नेत्याने सदस्यांना देतो म्हणून एकत्रित रक्कम उचलली व त्यापैकी सदस्यांना कमी देऊन काही रक्कम स्वत:च खिशात घातल्याची चर्चाही सुरू झाली आहे. त्याशिवाय ज्या पाच मतपत्रिका बाद झाल्या, त्यामागील मेंदू कुणाचा, याचीही विचारणा होत आहे. दोघांकडून पैसे घेतल्याने मानसिक दडपणाखाली मतदान कुणाला द्यायचे, याविषयी संभ्रम तयार झाल्यावर काहींनी दुसरा-तिसरा पसंती क्रम देऊन मतदान केल्याचे पुढे आले आहे.