मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल
By admin | Published: May 29, 2017 12:32 AM2017-05-29T00:32:28+5:302017-05-29T00:32:28+5:30
मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तसे वातावरण तयार होऊ लागले आहे. सकाळी दहापर्यंत सगळीकडे ढगाळ वातावरणासह वाहणारे वारे मान्सूनची चाहूल देत असल्याने बळिराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. खरीप मशागतीसह पेरणीसाठी शिवारे माणसांनी अक्षरश: फुलून गेली असून, जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भाताच्या धूळवाफ पेरण्यांचे काम जोरात सुरू झाले आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन यांसह कडधान्ये घेतली जातात. साधारणत: अडीच लाख हेक्टरमध्ये खरिपाची लागवड होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरनी वाढ झाली आहे. यावर्षी सगळीकडेच वळीव पावसाने चांगली हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला काढून खरीप पेरणीसाठी जमिनी तयार करण्यात शेतकरी मग्न झाला आहे. त्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आणि त्यानुसार मान्सूनचे मार्गाक्रमण सुरू आहे. अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असून, त्याची केरळकडे गतीने वाटचाल सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी दोन दिवस झाले वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जसे वातावरण असते, तसे वातावरण जिल्ह्यात सकाळी पाहावयास मिळत आहे. उन्हाअगोदर मशागत करून पेरणीसाठी जमिनी तयार करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो; त्यामुळे सकाळी सहा वाजताच शिवारे माणसांनी फुलून जात आहेत. करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत भाताच्या धूळवाफ पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. भाताचे १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४ हजार हेक्टरपेक्षा अधिक भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरमाथ्यावर भात व नागली रोपांच्या लागणीसाठी तरवा टाकण्याची तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तिथे भाताच्या पेरणीनंतर पाणी दिले जात आहे.