मान्सूनपूर्व पावसाने महाबळेश्वरला झोडपले!
By admin | Published: May 30, 2017 06:39 PM2017-05-30T18:39:36+5:302017-05-30T18:39:36+5:30
साताऱ्यातही हजेरी : दिवसभर केवळ ढग अन रिमझिम
आॅनलाईन लोकमत
सातारा/महाबळेश्वर, दि. ३0 : साताऱ्यासह महाबळेश्वरमध्ये मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी हजेरी लावली. महाबळेश्वरात दिवसभर पावसाने झोडपून काढले. थंड हवेसाठी आलेल्या पर्यटकांनी वर्षा सहलीचा अनुभव घेतला. साताऱ्यात सायंकाळी पाचच्या सुमारास दमदार पाऊस झाला.
सातारा जिल्ह्यातील फलटण, खटाव, माण, कोरेगाव तालुक्यातील काही गावे या दुष्काळी भागात यंदा वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र, सातारा, महाबळेश्वर, पाटण, जावळी या भागात पाऊस झाला नव्हता.
मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. पहाटेपासून साताऱ्यात ढगाळ वातावरण होते. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला. यामुळे शहरातील रस्त्यावर पाणी झाले होते.
मे महिन्याचा शेवटचा आठवडा असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. त्यातच महाबळेश्वर शहर परिसरातील सकाळी दहा वाजल्यापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. तर काही पर्यटकांना हॉटेलमध्येच बसून राहावे लागले.