वळीव पावसाने हेरले, मौजे वडगावंमध्ये लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:54 PM2020-04-17T13:54:16+5:302020-04-17T13:58:18+5:30
शेतकऱ्यांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. पावसापूर्वी सुटलेल्या वाऱ्यामुळे हेरले व मौजे वडगाव येथे काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या तसेच जनावरांचा गोठा,घरावरील पत्रे, ग्रीन हाऊस चे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हेरले : वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह जवळपास पाऊण तास झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले. सातत्याने ३७ ते ४० अंशापर्यंत गेलेल्या तापमानाने काहिली झालेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. पावसापूर्वी सुटलेल्या वाऱ्यामुळे हेरले व मौजे वडगाव येथे काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या तसेच जनावरांचा गोठा,घरावरील पत्रे, ग्रीन हाऊस चे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हेरले येथील दादासो बाळू कोळेकर यांचे ग्रीन हाऊसवरील पेपर ७५ टक्के फाटलेले आहे.या ग्रीन हाऊस मध्ये रंगीत ढोबळी मिरचीची झाडे उन्मळून पडले आहेत. यामध्ये ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आण्णा बाळू कोळेकर यांच्याही ग्रीन हाऊस मधील ५५ टक्के पेपर फाटला असून सव्वा ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सचिन जयगोंडा पाटील यांच्या जनावरांच्या गोट्याचे शेड वरील पत्र्याचे शेड उडून गेले असून जवळपास एक लक्ष रूपयाचे नुकसान झाले असून शेड नाहीसा झाला आहे. शौकत रमजान पेंढारी यांचाही जनावरांचा गोठयाचे पत्र्याचे शेड उडून गेले आहे अंदाजी पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामधील या गाईला किरकोळ दुखापत झाली आहे.पारीसा शंकर चौगुले सत्यांना मळा येथील घरावरील शेड उडून गेले असून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मौजे वडगांव येथील योगेश शेंडगे संजय शेंडगे व विश्वास शेंडगे यांच्या दुकान गाळ्याच्या दुसऱ्या मजल्यावरील चॅनेलसह पत्रे उडून खाली पडले त्यांचे अंदाजे पाच हजार रूपयांचे नुकसान झाले. म्हलारी तांदळे यांचे गोठयाचे शेड पडले, राजकुमार चौगले घराची छपरी व डीश तुटला , अभिजीत थोरवत गारमेंट शेड पडले, आनंदा थोरवत यांचे मळ्यातील गोठयाचे छ्परी कोसळली, रंगराव जांभळे यांचे गोठ्याचे शेड कोसाळले. आदी ठिकाणी प्रत्यक्षपणे तलाठी संदिप बरगाले व कोतवाल महंमद जमादार यांनी नुकसानग्रस्त ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली.
२०१९ ला आलेल्या महापुरातून कुठेतरी सावरत असताना कोरोना च्या तडाख्यात सापडलो तोपर्यंत काल झालेल्या वादळी पाऊसाने पार कंबरडे मोडले. अतोनात नुकसान झाले. शासनाच्या सहकार्याशिवाय मोडकळीस आलेला कणा सरळ होणे खूप अशक्य आहे...
- दादासो बाळू कोळेकर