पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार
By admin | Published: June 24, 2017 07:01 PM2017-06-24T19:01:05+5:302017-06-24T19:01:05+5:30
रामहरी रुपनर : धनगर समाज आरक्षण प्रश्नावरून आंदोलनासाठी महाराष्ट्रभर दौरे
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार असल्याचा इशारा आमदार व राज्यातील धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यात असणारा १४ टक्के धनगर समाज एकत्र आला तर सरकारची अडचण ठरूशकेल, असेही ते म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षण मेळाव्यासाठी शनिवारी आमदार रुपनर कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी पोटजाती बाजूला ठेवून विविध संघटनांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सत्तेवर कोणतेही सरकार असो ते धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमीच बगल देत आले आहे. यासाठी समाजाने एकजूट होऊन सरकारवर दबाव वाढविला पाहिजे. या आंदोलनाची ठिणगी भडकण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्"ांत मेळावे घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ जिल्"ांत मेळावे घेण्यात आले असून, त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. यातून मिळणाऱ्या लोकसहभागाच्या बळावर आंदोलनाचे उग्र रूप धारण करू, असा इशारा दिला. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी पाठिंबा मिळविण्यासाठी दिलेला शब्द सत्तेवर आल्यावर पाळला नसल्याचा आरोप करत जर राज्यात १४ टक्के असणारा धनगर समाज एकत्र आल्यास राज्य सरकारची अडचण ठरू शकेल, त्यामुळे सरकारने आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशीही मागणी केली. चौकट.. प्रश्न सोडविण्यास मंत्री जानकर असमर्थ धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे यापूर्वी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केल्याने जानकर हे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरल्याची टीका आमदार रुपनर यांनी यावेळी केली, तर शिवसेना सत्तेत असूनही गोंधळलेल्या अवस्थेत असून, त्यांनी जनतेची विश्वासार्हता गमावली असल्याचे त्यांनी सांगितले. चौकट.. चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी अनेक प्रश्न सोडविण्याची धुरा ते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोपवितात. तसेच चंद्रकांतदादांकडे विषय जाणे म्हणजे त्याची सोडवणूक न होणे अगर तो प्रश्न गुंतागुंतीचा करून ठेवणे असेच असल्याने चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार असल्याचीही टीका आमदार रुपनर यांनी केली.