विद्यमान पदाधिकाऱ्यांना महिन्याभराचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:24 AM2021-01-03T04:24:00+5:302021-01-03T04:24:00+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना आणखी किमान महिन्याभराचा दिलासा मिळणार आहे. दिनांक २२ जानेवारी ...
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना आणखी किमान महिन्याभराचा दिलासा मिळणार आहे. दिनांक २२ जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा अनावरण समारंभानंतर या सर्वांचे राजीनामे घेतले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलाचे वारे वाहत आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने नेत्यांनीही गडबड केलेली नाही. परंतु, इच्छुकांनी जोडण्या लावायला सुरूवात केली आहे. दिनांक २ जानेवारी रोजी अध्यक्ष बजरंग पाटील आणि उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांची राजीनामे घेतले जातील, असा अंदाज होता.
त्यातच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिनांक २२ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ३९ रूग्णवाहिकांचे लोकार्पण असा भव्य कार्यक्रम आयोजित केल्याने या पदाधिकाऱ्यांसाठी हा दिलासा ठरणार आहे. हा कार्यक्रम तोंडावर असताना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले जाणार नाहीत. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर मात्र ते घेण्यासाठी वेळ घालवला जाणार नाही, अशीही चर्चा आहे. तोपर्यंत ग्रामपंचायतींचे निकालही लागतील. त्यामुळे तातडीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
चौकट
मोठ्या कार्यक्रमाची संधी
कोरोनामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या काळात फारसे कार्यक्रम झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम झाले. परंतु, ती उणीव मुश्रीफ यांनी भरून काढली असून, थेट शरद पवार यांच्या उपस्थितीतच कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.