ऑक्टोबर महिन्यात मृग मोेहरला, कोल्हापुरात दिवसभर जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 10:45 AM2020-10-15T10:45:08+5:302020-10-15T10:46:46+5:30
raun, kolhapurnews, कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात मृग मोहरल्यासारखे वातावरण आहे. या पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १७) पर्यंत असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. ऐन ऑक्टोबर महिन्यात मृग मोहरल्यासारखे वातावरण आहे. या पावसाने भात, भुईमूग, सोयाबीन पिके पाण्यात गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवार (दि. १७) पर्यंत असाच पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
परतीचा पाऊस हा वळवासारखा लागतो. जिथे पडेल तिथे पडेल असाच असतो. मात्र बुधवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस दिवसभर आहे. मृगाच्या नक्षत्राप्रमाणे आता वातावरण आहे. एकसारखी रिपरिप सुरू राहिली. सध्या भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस आले आहे. पावसामुळे शिवारांत पिकांवर पाणी उभे राहिल्याने हातातोंडाला आलेली पिके खराब होणार, हे आता निश्चित आहे.
हंगाम लांबणीवर पडणार
राज्य शासनाने यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कर्नाटकात लवकर हंगाम सुरू होत असल्याने सीमाभागासह जिल्ह्यातील काही कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू होतात. मात्र सध्या पावसाचा जोर पाहता किमान दहा-बारा दिवस हंगाम पुढे जाणार, हे निश्चित आहे.
पावसाला थंडी
सकाळपासून एकसारखी रिपरिप सुरू आहे. पावसाबरोबर वातावरणात कमालीचा गारठा असल्याने दिवसभर अंगातून थंडी गेली नाही. निरुत्साही वातावरणामुळे घराबाहेर पडावेसे वाटत नव्हते. कोल्हापूर शहरात रिपरिप असल्याने दुकानात गर्दी कमी होती, अनेक ठिकाणी बाजारपेठा ओस पडल्यासारख्या होत्या.
धरणातून विसर्ग सुरू
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने विसर्ग सुरू झाला आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद ४००. कोयनेतून ८३५३, तर अलमट्टीतून ८७ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
उद्यापासून वादळाची तीव्रता कमी
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाला. पुढे त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले. हे वादळ बुधवारी आंध्रप्रदेश मध्ये होते. ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहे. आज, गुरुवारी ते मुंबई येथे धडकणार आहे. उद्या, शुक्रवारपासून ते अरबी समुद्राकडे आगेकूच करील आणि शनिवारी (दि. १७) ते अरबी समुद्रात जाणार आहे. साधारणत: शुक्रवार (दि. १६) पासून वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर पाऊसही थांबेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.