शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी महिन्याभरात बैठक : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 02:59 PM2020-01-20T14:59:06+5:302020-01-20T15:02:35+5:30
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महिन्याभरात संबंधित विभागाचे मंत्री आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, तेथून मोकळ्या हाताने पाठविणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महिन्याभरात संबंधित विभागाचे मंत्री आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, तेथून मोकळ्या हाताने पाठविणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेचे रविवारी कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षकांना लावण्यात येणाºया ‘बीएलओ’सारखी अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी महसूल विभागाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिले.
शरद पवार म्हणाले, शिक्षकांच्या रास्त मागण्यांसाठी गेली अनेक वर्षे संभाजीराव थोरात यांनी काम केले. सत्ता असो अथवा नसो, ते कामाचे कधी थांबले नाहीत. आता सरकार आपले आल्याने अपेक्षा वाढणे गैर नाही. फेबु्रवारीमध्ये राज्याचे अधिवेशन ते घेत आहेत, त्याला आम्ही सगळे हजर राहूच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आग्रह करू. आपल्या विविध प्रमुख सात मागण्या आहेत; मात्र चिंता करू नका.
पूर्वी इतरांना विनंती करावी लागत होती. आता तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली असून, या मागण्यांसाठी महिन्याभरात शिक्षण, नगरविकास व ग्रामविकासमंत्री, सचिवांना घेऊन बैठक बोलावली जाईल. अर्थ विभागाची महत्त्वाची भूमिका असते, त्यांनाही सांगू. सगळ्यांना घेऊन शिक्षकांना मदत करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. या बैठकीतून शिक्षकांना मोकळ्या हाताने पाठविणार नाही.
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, शिक्षक संघाने नेहमीच पुरोगामी विचाराला साथ दिली असून, त्यांनी कधी वेगळा विचार केला नाही. अलिकडे शिक्षणक्षेत्रात सगळीजण मनापासून काम करत असल्याने मोठे चैतन्य आल्याचे दिसते. शिक्षकांची अतिरिक्त कामे कमी करण्यासाठी महसूल विभाग सकारात्मक आहे. सर्व गोष्टींची तपासनी करून जरूर ते सहकार्य केले जाईल.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात म्हणाले, शिक्षकांचे अनेक प्रश्न असले तरी आता आपले सरकार आल्याने टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवून घेऊया. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न गंभीर बनला आहे. फेबु्रवारी २०१७ बदल्यांचा काढलेला जाचक अद्यादेश दुरुस्त करावा.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोईची बदली करू, तुमच्या रास्त असणाºया मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. मागण्यांबाबतची चिंता सोडा आणि भावी पिढीला दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण देण्याची जबाबदारी हातात घ्या.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे, महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, एन. वाय. पाटील, विनोद राऊत, अनुराधा तकटे, जनार्दन निऊंगरे, अंबादास वाझे, आदी उपस्थित होते. मोहन भोसले यांनी स्वागत केले. संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आभार मानले.
पवार यांच्या फिरकीने थोरात अचंबित
शिक्षक संघाच्या लेटरपॅडवर शिक्षक नेते संभाजीराव थोरात असा उल्लेख असल्याचे पाहून शरद पवार म्हणाले, संभाजीराव तुम्ही नेते केव्हापासून झालात, मला वाटले मीच नेता आहे; मात्र एक चांगले झाले, माझे काम तुम्ही सोपे केले. अशा शब्दांत फिरकी घेतल्याने थोरात अचंबित झाले.
थोरात यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
प्राथमिक शिक्षक संघात शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात असे दोन गट आहेत. मध्यंतरी शिवाजीराव पाटील यांच्या गटाने येलूर (इस्लामपूर) येथे महामंडळ सभा घेतली होती. त्याच्या तुलनेत थोरात गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.
युती सरकारला गुरुजींचा नाद महागात पडला
गेल्या पाच वर्षांत शिक्षक कमालीचे अस्वस्थ होते. शहाणे लोकप्रतिनिधी, शहाणे राज्यकर्ते व शहाणे अधिकारी गुरुजींचा नाद करत नाहीत. गुरुजींचा नाद केला तर काय होते, हे युती सरकारने अनुभवल्याचा इशारा संभाजीराव थोरात यांनी दिला.