नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे मुरगूडकरांच्या नजरा

By admin | Published: July 19, 2016 11:14 PM2016-07-19T23:14:51+5:302016-07-19T23:48:23+5:30

कार्यकर्ते लागले तयारीला : प्रभाग आरक्षण सत्ताधारी गटाच्या पथ्यावर

Moorcudankar's look at the municipal reservation leave | नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे मुरगूडकरांच्या नजरा

नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे मुरगूडकरांच्या नजरा

Next

अनिल पाटील -- मुरगूड--काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच गटांनी सावध पवित्रा घेतला असून, इच्छुक सर्वच प्रमुख गटांसह नागरिकांच्या नजरा मंत्रालयातील नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. नगराध्यक्ष आरक्षण सोडत निघाल्यानंतरच लढतीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. जरी सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गट व मंडलिक गटामध्ये दुरंगी लढत होणार असली तरी घाटगे गटाने जनसंपर्क वाढवल्याने आणि जमादार गटाने आपले अस्तित्व स्वतंत्र असल्याचे जाहीर केल्याने नगरपरिषदेच्या रणांगणामध्ये चांगलाच रंग चढणार हे नक्की.
कागल तालुक्यातील नगरपरिषदेवर सत्ता असणाऱ्या गटाला विधानसभेच्या लढतीचा मार्ग सुकर होतो म्हणूनच मुश्रीफ गट व मंडलिक गट या पालिका आपल्या ताब्यात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. याशिवाय भाजपनेही आपले पत्ते खुले करण्यासाठी चाचपणी सुरू केली असून, महाडिक गटही हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
मुरगूड नगरपरिषदेच्या राजकीय पटलावर नजर टाकल्यास नगरपालिकेवर येथील पाटील गटानेच वर्चस्व दाखवल्याचे दिसते. काहीवेळा मंडलिक गटाने पाटील गटाकडून सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनानुसार रणजितसिंह-प्रवीणसिंह पाटील गट व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली. त्या आघाडीत व मंडलिक गट यांच्यात दुरंगी लढत झाली. यामध्ये पाटील-मुश्रीफ आघाडीला १३ जागा मिळाल्या, तर मंडलिक गटाला ४ जागांवर समाधान मानावे लागले. दीड वर्षाच्या कालावधीनंतर मुश्रीफ गटाचे राजेखान जमादार यांनी आपल्या अन्य दोन नगरसेवकांसोबत मंडलिक गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे सध्या सभागृहात पाटील गट १० व मंडलिक गट ७ असे बलाबल आहे. मागील निवडणुकीत विक्रमसिंह घाटगे गट मात्र तटस्थ राहिला होता.
आरक्षणावर कोणत्याच गटाने हरकती घेतल्या नाहीत. याचा अर्थ सर्वच गटाला ही प्रभाग निश्चिती आणि आरक्षण मान्य आहेत; पण याचा फायदा सत्ताधारी गटाला जास्त होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. मंडलिक गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या बाजारपेठ भागात अन्य गावभागातील काही भाग जोडला असल्याने मंडलिक गटाला या प्रभागामध्ये झुंजावे लागणार आहे. गावभागातील प्रभाग रचना ही सत्ताधारी गटाच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसते. त्यामुळे प्रभाग आरक्षणावर सत्ताधारी पाटील-मुश्रीफ गट समाधानी असल्याचे दिसून येते.


सत्ताधारी पाटील-मुश्रीफ आघाडी शहरात कोट्यवधी रुपयांची केलेली विविध विकासकामे घेऊन जनतेसमोर जात आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांनी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी या आघाडीच्या पथ्यावर पडला आहे, तर शहरातील विकासकामांबाबत साशंकता व्यक्त करत आम्हीही शहराचा विकास करू शकतो हा मुद्दा लोकांना पटवून सांगत मंडलिक गट निवडणुकीला सामोरे जात आहे.

पाटील गट व मुश्रीफ गट यांची युती निश्चित
आरक्षण काही येवो, पाटील गट व मुश्रीफ गट यांची युती निश्चित मानली जाते; पण मागील निवडणुकीत मुश्रीफ गटात असणारे जमादार हे मंडलिक गटात आपल्या कार्यकर्त्यांसह डेरेदाखल झाले आहेत. मध्यंतरी राजेखान जमादार हे मंडलिक गट व जमादार गट हे एकच असल्याचे सांगत होते; परंतु आता मात्र त्यांचे निकटवर्ती कार्यकर्ते जमादार गटाचे अस्तित्व वेगळेच असल्याचे सांगत असून, आपल्या गटाला समाधानकारक न्याय देईल त्याबरोबर आपण राहणार असल्याचे सांगत आहेत.
मागील निवडणुकीत पूर्णपणे तटस्थ असणारा राजे गट मात्र काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे लवकरच चित्रात आला आहे. त्यामुळे या गटाची भूमिका काय असणार, हेही गुलदस्त्यात आहे. सर्वच गटांतील इच्छुकांनी लागणारे दाखले, अन्य कागदपत्रे काढण्यास सुरुवात केल्याने ज्वर वाढत चालला आहे.

Web Title: Moorcudankar's look at the municipal reservation leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.