मुरगूड पालिकेच्या सत्ताधाºयांत खडाजंगी--मुरगूड नगरपालिका सभा :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:32 AM2017-09-28T00:32:43+5:302017-09-28T00:33:12+5:30
मुरगूड : मुरगूड शहरातील अपंगांना अनुदान वाटपाच्या मुद्द्यावर नगरपालिकेत १५ नगरसेवक असलेल्या मंडलिक गटावर मतदान घेण्याची नामुष्की ओढावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरगूड : मुरगूड शहरातील अपंगांना अनुदान वाटपाच्या मुद्द्यावर नगरपालिकेत १५ नगरसेवक असलेल्या मंडलिक गटावर मतदान घेण्याची नामुष्की ओढावली. नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी कायद्याच्या विरोधात असलेल्या समान अनुदान वाटपाच्या मागणीस विरोध केला; पण मंडलिक गटाचे प्रमुख नेते नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, दीपक शिंदे यांनी अनुदान समान वाटण्याचीच मागणी केल्यावरून गोंधळ सुरू झाल्यानंतर जमादार यांनी बहुमताची मागणी केली. समान अनुदान वाटपाच्या मागणीच्या विरोधात नऊ, तर समर्थनात आठजणांनी हात उंचावून मतदान केले. यासह अन्य विषयांवरही सत्ताधारी नगरसेवक आणि नगराध्यक्ष, अधिकाºयात खडाजंगी झाली.
शहरातील १०४ अपंगांना समान अनुदानाचे वाटप करावे, अशी मागणी अपंग संघटनेने केली होती, अर्थात नगराध्यक्ष जमादार, उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, आदींनी याला विरोध करीत अपंगत्वाची टक्केवारी पाहून अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला. सभागृहात हा विषय बुधवारी आल्यानंतर अनुराधा राऊत यांनी याला विरोध करीत आक्रमकपणे समान वाटप झालेच पाहिजे, अशी मागणी केली. यावर नामदेवराव मेंडके, शिवाजीराव चौगले, दीपक शिंदे, राहुल वंडकर, रविराज परीट यांनी ही समान वाटपाची मागणी केली. मारुती कांबळे यांनी अपंग व्यक्तीची टक्केवारी पाहून त्यानुसार त्यांना अनुदान द्यावे अशी सूचना मांडली; पण मंडलिक गटाच्या जुन्या लोकांनी याला विरोध केला. गोंधळ पाहून नगराध्यक्ष जमादार यांनी बहुमताची मागणी केली.
याला विरोध करीत हात उंचावून नामदेवराव मेंडके, धनाजी गोधडे, रविराज परीट, राहुल वंडकर, सुप्रिया भाट, अनुराधा राऊत, रेखा मांगले, संगीता चौगले या आठ, तर स्वीकृत नगरसेवक शिवाजीराव चौगले व दीपक शिंदे यांनीही मतदान केले. जमादार यांच्या बाजूने नऊ नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे नऊ विरोधी आठ अशा फरकाने अनुदान टक्केवारीवर वाटायचे यावर शिक्कामोर्तब झाले.
मागील सभेचे प्रोसीडिंग वाचताना तीन टेंडरना मंजुरी का दिली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत धनाजी गोधडे, नामदेवराव मेंडके, दीपक शिंदे यांनी याला विरोध केला. यावरही जोरदार चर्चा झाली. शेवटी सर्व टेंडर पुन्हा काढण्याचा निर्णय झाला. याशिवाय मुरगूड शहरातून एका कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्त्याची खुदाई केली असून, यासाठी परवानगी घेतली का, असा प्रश्न दीपक शिंदे यांनी उपस्थित केला. यावर परवानगी न घेता ही कंपनी रस्ते खुदाई कशी करते, असा प्रश्न उपस्थित करीत या कंपनीच्या केबल कट करा, अशी सूचना प्रशासनाला केली; पण मेंडके यांनी कंपनीने काही रक्कम दिली आहे का, अशी विचारणा करीत जर दिली असेल तर कुठे आहे, असा जाब विचारला. ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयाला अनुसरून शासन परिपत्रकानुसार काही कार्यक्रम झाले.
यावर आक्षेप घेत शिवाजीराव चौगले यांनी कार्यक्रमाचे नियोजन होत असताना सर्व नगरसेवकांची मते जाणून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. दारिद्र्य-रेषेखालील यादीचे चुकीचे सर्वेक्षण झाले असून, ते नवीन करण्याची मागणी संदीप कलकुटकी यांनी केली. यास सर्वांनी मंजुरी दिली. विरोधी नगरसेवक रवी परीट यांनी भटक्या कुत्र्यांचा विषय मांडला; पण सभेला वेळ झाला आहे, असे सांगून तो विषय चर्चेला घेतला नाही.
प्रश्न विचारण्यास मज्जाव
आयत्या वेळेच्या विषयाला अनुसरून नामदेवराव मेंडके, धनाजीराव गोधडे, शिवाजीराव चौगले व दीपक शिंदे या सत्ताधारी मंडलिक गटाच्या, तर विरोधी गटाच्या राहुल वंडकर आणि रवी परीट यांना कोणताही प्रश्न उपस्थित करू दिला नाही. जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर ते सभेच्या अगोदर लेखी नगराध्यक्ष यांच्याकडे दिले पाहिजे होते असे सांगून नगराध्यक्ष जमादार यांनी या सर्वांना प्रश्न विचारण्यास मज्जाव केला.
विरोधी पक्षनेत्यांना खडसावले
विरोधी नगरसेवक राहुल वंडकर हे काही प्रश्न विचारत असताना त्यांना खडसावतच नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी, तुम्ही अजून अज्ञानी आहात सभागृहाचे नियम काय आहेत, सभागृहात कसे बोलायचे असते हे माहीत करून घ्या, असा सल्ला देत पालिकेमार्फत तुम्हाला प्रशिक्षणाला आपण पाठवितो, असेही त्यांनी सांगितले.