मोरेवाडीतील जमीन पुन्हा ‘अंबाबाई’च्या नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:35 AM2017-09-13T00:35:34+5:302017-09-13T00:35:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नावे असणारी मौजे मोरेवाडी (ता. करवीर) येथील आठ एकर जमीन तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘इनाम जमिनी’च्या कायद्याला बगल देत विक्रीसाठी मोकळी असल्याचा आदेश दिला होता. मात्र, बेकायदेशीररीत्या विक्री झालेल्या आठ एकर जमिनीच्या सात-बारावर पुन्हा एकदा ‘अंबाबाई’चे नाव लागले आहे. ही प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली आहे. आजच्या दराने या जमिनीची किंमत ५० कोटी इतकी असल्याची माहिती प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मौजे मोरेवाडी येथील गट नं.३२ व ४५ (क्षेत्र सुमारे ८ एकर) ही जमीन श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नावे होती. नियमानुसार इनाम जमीन कोणालाही विकता येत नसतानाही मार्च २०११ मध्ये धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता ही जमीन परस्पर बांधकाम व्यावसायिक धनंजय साळोखे यांना विकण्यात आली. त्यांनी या जमिनीचा ‘देवस्थान इनाम वर्ग-३’ रद्द करून जमीन भरआकारी करण्यासाठी महसूल मंत्र्यांकडे अर्ज केला. तत्कालीन महसूल मंत्री सुरेश धस यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये हा अर्ज मंजूर करून ही जमीन ‘देवस्थान इनाम वर्ग’मधून कमी केली. मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी सुरेश धस यांनी दिलेले सर्व आदेश रद्द केले. त्यानंतर महसूल मंत्रिपदी आलेल्या एकनाथ खडसेंनी डिसेंबर २०१५ रोजी पुन्हा या जमिनीचा ‘इनाम वर्ग-३’चा शेरा रद्द केला. महसूल यंत्रणेतील अधिकाºयांच्या संगनमतामुळे पुढील प्रक्रिया राबविण्यात आली व या जमिनीची पुन्हा-पुन्हा विक्री करण्यात आली.
ही जमीन बिल्डर साळोखे यांनी विजय बाबूराव शेवाळे (६० गुंठे), प्रवीणसिंह जयसिंगराव घाटगे व वीरेंद्रसिंह प्रवीणसिंह घाटगे (सामाईक क्षेत्र १२० गुंठे), संजय प्रतापराव साळुंखे (९ गुंठे) आणि विक्रमसिंह भिकाजीराव गायकवाड (२३ गुंठे) यांना विकली. माहितीच्या अधिकारात जमिनीची माहिती मिळाल्यानंतर प्रजासत्ताक संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मार्च २०१६ मध्ये गैरकारभाराची तक्रार केली. मात्र, गेल्या अठरा महिन्यांत त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर करवीरचे प्रातांधिकारी सचिन इथापे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आणि पुराव्यांनिशी जमिनीची बेकायदा विक्री झाल्याचे सिद्ध झाल्याने ११ जुलै २०१७ रोजी प्रांताधिकाºयांनी या जमिनीच्या सात-बारावरील सर्व खरेदीदारांची नावे कमी करून पुन्हा त्यावर ‘करवीर निवासनी देवीचे’ नाव लावले व इतरांची नांवे कमी केली. यावेळी उपाध्यक्ष सुशील कोरडे, सचिव बुºहान नायकवडी उपस्थित होते.