मंडलिक, आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव--जिल्हा परिषदेचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:06 AM2019-05-25T10:06:08+5:302019-05-25T10:09:14+5:30
शिवसेनेचे संजय मंडलिक भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आता त्यांच्यावर आणि आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव येऊ शकतो
समीर देशपांडे
कोल्हापूर : शिवसेनेचे संजय मंडलिक भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आता त्यांच्यावर आणि आमदार प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील यांच्यावर नैतिक दबाव येऊ शकतो. २१ सप्टेंबर २०१९ रोजी सध्याच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांची मुदत संपते. त्यानंतरच्या नव्या समीकरणामध्ये मंडलिक, आबिटकर, पाटील हे सत्तेत असू शकतात. सहकार्य करण्याचा शब्द जर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी टाकला तर त्यांना तो मान्य करावा लागेल, असे दिसते.
सध्या जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असली तरी शिवसेनेचे पाच सदस्य विरोधात आहेत; तर कॉँग्रेस, राष्ट्रवादीला मानणाऱ्या पाचजणांनी भाजपचा अध्यक्ष होण्यास मदत केली आहे. अशा परिस्थितीत सध्या सत्तारूढ भाजप मित्रपक्षांकडे ६७ पैकी ३७ सदस्य असून, विरोधकांकडे २८ सदस्य आहेत. भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाल्यानंतर खरोखरच जर युतीधर्म पाळला गेला तर केवळ जनसुराज्यच्या पाठिंब्यावर पुन्हा युतीचा अध्यक्ष होऊ शकतो, अशी आजची स्थिती आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकीकडे कॉँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांच्यात अध्यक्षपदासाठीची लढत होणार असताना, महाडिक यांच्यासाठी कॉँग्रेसच्या दोन, तर राष्ट्रवादीच्या एका सदस्याने मदत करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या युवक आघाडीचे दोन सदस्य, पी. एन. पाटील यांच्यावरील रागापोटी प्रकाश आवाडे यांच्या आघाडीचे दोन सदस्य आणि त्यांच्या सोबतीने ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य महाडिक यांच्यासोबत राहिले. ‘जनसुराज्य’शी त्याआधीच चर्चा झाल्याने त्यांचे सहा सदस्य आणि एक अपक्ष महाडिक यांच्या पाठीशी राहिले.
शिवसेनेचे चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर आणि संजय घाटगे यांच्या सात सदस्यांनी महाडिक यांच्यासाठी भाजपला पाठिंबा दिला. दुसरीकडे, प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीचे तीन आणि उल्हास पाटील, संजय मंडलिक गटाचा प्रत्येकी एक असे पाच सदस्य राष्ट्रवादी, कॉँग्रेससोबत राहिले. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शौमिका महाडिक यांचा विजय निश्चित झाला आणि ऐनवेळी राहुल पाटील यांचे नाव माघारी घेण्यात आले.
बदलत्या परिस्थितीत प्रकाश आवाडे यांनी जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांचे दोन सदस्य विरोधात राहण्याची शक्यता आहे. हीच भूमिका जर राष्ट्रवादीने घेतली तर सत्ता टिकविण्यासाठी उर्वरित शिवसेनेच्या सदस्यांनाही मदतीसाठी आवाहन करण्यात येईल. आता तर कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांतून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिवसेनेचे खासदार बनल्याने त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे ऐकावे लागेल.
शेट्टी नेमके काय करणार ?
भाजप -शिवसेनेवर रोज टीका करणारे राजू शेट्टी लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेत राहतील की सत्तेबाहेर पडतील, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये शिवसेना-भाजपसोबत असतानाही शेट्टी यांनी जिल्हा परिषदेतील कॉँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला नव्हता.
...................................
आघाडी धर्म पाळल्यास अशी असेल स्थिती
भाजप, शिवसेना, जनसुराज्य
भाजप : १४
जनसुराज्य : ०६
ताराराणी (महाडिक) आघाडी : ०३
आमदार चंद्रदीप नरके गट : ०३
आमदार सत्यजित पाटील गट : ०२
आमदार सुजित मिणचेकर : ०१
माजी आमदार संजय घाटगे : ०१
आबिटकर आघाडी, शिवसेना : ०३
आमदार उल्हास पाटील : ०१
संजय मंडलिक गट : ०१
अपक्ष रसिका पाटील : ०१
--------------------------
एकूण : ३६
-------------------------------
काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमान
काँग्रेस : १४
राष्ट्रवादी : ११
चंदगड (कुपेकर)आघाडी : ०२
आवाडे गट : ०२
स्वाभिमानी शेतकरी संघटना : ०२
.......................................................
एकूण - ३१
..................................