जिल्हा परिषदेवर आरोग्य परिचरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 07:35 PM2020-12-16T19:35:00+5:302020-12-16T19:37:11+5:30
Zp, Health, Morcha, Kolhapurnews आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या परिचरांनी बुधवारी दुपारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.
कोल्हापूर : आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या परिचरांनी बुधवारी दुपारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवरमोर्चा काढला. आयटक संलग्न कोल्हापूर जिल्हा आरोग्य परिचर संघटनेच्यावतीने हा मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर घोषणा देण्यात आल्या.
अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये अनेक वर्षे कार्यरत असणाऱ्या परिचरांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांना अर्धवेळ असल्याकारणाने कायद्याने मिळणाऱ्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. कोरोना काळात मोठे काम करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
या मागण्यांचा प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी कॉ. दिलीप पवार यांनी केली. यावेळी त्यांच्यासह बाबा यादव, एस. बी. पाटील, कुंडलिक एकशिंगे, सुशीला यादव, भगवान यादव, उत्तम पाटील यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नामदेव मोरे यांच्याशी चर्चा केली.
सेवेत कायम करावे, ७ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकांची अंमलबजावणी करावी, निवृत्तिवेतन सुरू करावे, वेतन रक्कम थेट बँक खात्यात जमा करावी, शिपाई भरतीवेळी परिचरांना प्राधान्य द्यावे, सरकारी विमा योजनेचा लाभ मिळावा, दिवाळी बोनस मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.