मुगळी ग्रामस्थांचा आरोग्य केंद्रावर मोर्चा

By admin | Published: July 28, 2016 12:35 AM2016-07-28T00:35:00+5:302016-07-28T00:51:45+5:30

महिलेवरील चुकीची शस्त्रक्रिया प्रकरण : दवाखान्यात घुसण्याचा प्रयत्न; डॉ. सातपुतेंची तत्काळ बदली

A Morcha of the Mogali Village Health Center | मुगळी ग्रामस्थांचा आरोग्य केंद्रावर मोर्चा

मुगळी ग्रामस्थांचा आरोग्य केंद्रावर मोर्चा

Next

सेनापती कापशी : सेनापती कापशी (ता. कागल) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राजश्री अभिजित करडे यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया न करता त्यांच्या मूत्राशयास गंभीर इजा पोहोचविलेल्या आरोग्य अधिकारी डॉ. बी. पी. सातपुते यांच्या विरोधात मुगळी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. डॉ. सातपुते यांना दवाखान्यातून हाकलून बाहेर काढले. त्यावेळी ग्रामस्थांच्या संतप्त भावनांचा उद्रेक झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवावा लागला.
याबाबतची अधिक माहिती अशी, चिमगाव (ता. कागल) येथील राजश्री अभिजित करडे या माहेरी मुगळी येथे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्याकरिता आल्या होत्या. २६ जुलैला कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचा कॅम्प असल्याने त्या दि. २५ रोजी दवाखान्यात दाखल झाल्या. शस्त्रक्रियेदरम्यान डॉ. सातपुते यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया न करता मूत्राशयास गंभीर दुखापत केली व नातेवाइकांना कोणतीही कल्पना न देता ताबडतोब कोल्हापूरला रुग्णालयात हलविण्याची सूचना केली. तसेच डॉ. सातपुते यांनी नातेवाइकांना उद्धट उत्तरे दिली. माझी बदली कोण करतोय बघूया, असा दमच दिला.
बुधवारी कापशी आरोग्य केंद्रात उद्रेक झाला. अकराच्या सुमारास मुगळी येथील तीनशे ते चारशे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रावर मोर्चा काढून दवाखान्यात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच
डॉ. सातपुतेंच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी डॉ. सातपुते दवाखान्यात होते. त्यांनी ग्रामस्थ आलेले पाहून बाहेर न येण्याचा पवित्रा घेतला. काही ग्रामस्थांनी त्यांना हाकलून बाहेर काढले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी पोलिस बंदोबस्त वाढविला.
तीनच्या दरम्यान, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. नांद्रेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजयकुमार गवळी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार डॉ. सातपुते यांची आजच्या आज येथून बदली करीत असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. डॉ. सातपुतेंना आजच्या आज निलंबित करण्यावर ग्रामस्थ ठाम होते. शेवटी चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी व आरोग्य अधिकाऱ्यानंी दिले. दरम्यान, ही घटना निषेधार्ह आहे. आता डॉ. सातपुतेला निलंबितच नाही, तर बडतर्फ करा, अन्यथा आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या दालनासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जि. प. सदस्य परशराम तावरे यांनी दिला.

चौकशी करून कारवाई
जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची माहिती
कोल्हापूर : सेनापती कापशी (ता. कागल) ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेऐवजी डॉ. डी. पी. सातपुते यांनी रुग्ण महिलेच्या मूत्राशयास गंभीर दुखापत केलेल्या प्रकरणाची जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विजय नांदे्रकर यांना अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी
डॉ. प्रकाश पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनीही या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजश्री अभिजित करडे यांची दीड महिन्यापूर्वी प्रसूती झाली. त्यांना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची होती म्हणून सेनापती कापशी ग्रामीण रुग्णालयात त्या सोमवारी (दि. २५ जुलै) दाखल झाल्या. मंगळवारी (दि. २६ जुलै) सकाळी साडेनऊ वाजता त्यांना
डॉ. सातपुते यांनी शस्त्रक्रियेसाठी घेतले.
करडे यांच्यावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेऐवजी मूत्राशयाची वाहिनी कापली.
तसेच त्यांना बाजूला ठेवून डॉक्टरांनी तिसरी शस्त्रक्रिया केल्याची लेखी तक्रार संबंधित महिलेचे सासरे रामचंद्र बाळू करडे यांनी बुधवारी जिल्हा आरोग्याधिकारी पाटील यांच्याकडे केली. या घटनेची दखल घेत आरोग्याधिकारी पाटील यांनी तातडीने येथील खासगी रुग्णालयात जाऊन संबंधित रुग्ण महिलेच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

चूक डॉक्टरची...मनस्ताप रु ग्णाला
राजश्री करडे यांना दीड महिन्यांचा चिमुकला मुलगा आहे. कापशीहून आल्यावर त्यांना पहिल्यांदा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले; परंतु तिथे मुलाला ठेवता येणार नाही, असे त्यांना बजावण्यात आल्याने एवढ्या चिमुकल्या बाळास कुठे ठेवणार म्हणून त्यांनी खासगी रुग्णालयात जाणे पसंत केले. ‘डॉक्टरची चूक आणि भुर्दंड मात्र रुग्णांना’ असा अनुभव त्यांना आला आहे. त्यामुळे रुग्णालयाचा व औषधांचाही खर्च डॉक्टरांनी द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: A Morcha of the Mogali Village Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.