पंचगंगा स्मशानभूमीत ९0 हजार पेक्षा जास्त शेणीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 04:07 PM2020-03-10T16:07:49+5:302020-03-10T16:08:53+5:30
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतो. वर्षाला सुमारे ३५ लाख शेणी लागतात. सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरणपूरक होळी ...
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतो. वर्षाला सुमारे ३५ लाख शेणी लागतात. सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरणपूरक होळी अशा दुहेरी उद्देशाने होळीनिमित्त सोमवारी ९0 हजार शेणीदान केल्या. कोल्हापुरातील १५ पेक्षा जास्त मंडळ, नागरीकसह अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.
होळीला शहरातील विविध संस्थांकडून पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान केल्या जातात. यंदाही या उपक्रमात खंड पडला नाही. महापालिका कर्मचारी, मानसिंग पाटील युवा मंच, कृष्णा मित्र मंडळ, रोहित घळसासी मित्र मंडळ, उदय माळी, नेहरु नगर मित्र मंडळ, दत्त ग्रुप हॅपी क्लब, लक्षतीर्थ विकास फौंडेशन, हुन्नुर गल्ली, मैत्री कट्टा ग्रुप अशा विविध संस्थांनी शेणी स्मशानभूमीस दिल्या.
लक्षतीर्थ विकास फौंडेशनचा अनोखी भेट
रक्षाविसर्जनावेळी बादल्या, तांबे असे साहित्य लागते. लक्षतीर्थ विकास फौंडेशनच्यावतीने याचा विचार करुन होळी निमित्त पंचगंगा स्मशानभूमीकडे ४ स्टीलच्या बादल्या, ४ सुपल्या, ५ तांबे असे साहित्य देण्यात आले. या फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती देणार सव्वा दोन लाख शेणी
सानेगुरुजी परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सवा समितीच्यावतीने दरवर्षी होळी दिवशी पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान केल्या जातात. यावर्षी रविवारी (दि.१५) सकाळी ९ वा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये २ लाख २५ हजार शेणीदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे गुरुप्रसाद जोशी यांनी दिली आहे.
आरोग्य निरिक्षकांकडूनही शेणीदान
महापालिकेकडे आरोग्य निरिक्षकपदावर असणाऱ्या शुभांगी पवार यांनी पंचगंगा स्मशानभूमीला २ हजार शेणीदान केल्या. रोख स्वरुपात मदत करण्याऐवजी त्यांनी शेणीदान केल्या.