कोल्हापूरात धोकादायक इमारती उतरवण्यास प्रारंभ, शंभरहून अधिक नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 06:24 PM2019-07-02T18:24:40+5:302019-07-02T18:26:27+5:30
मुंबईपाठोपाठ पुण्यात भींती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धोकादायक इमारती उतरवण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. तत्पुर्वी शहरातील सुमारे शंभरहून अधिक धोकादायक इमारतींना उतरुन घेण्याच्या तसेच स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
कोल्हापूर : मुंबईपाठोपाठ पुण्यात भींती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धोकादायक इमारती उतरवण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. तत्पुर्वी शहरातील सुमारे शंभरहून अधिक धोकादायक इमारतींना उतरुन घेण्याच्या तसेच स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
जुन्या कोल्हापूरात म्हणजेच बिंदू चौक सबजेल परिसर, गंगावेश, महाद्वार रोड (अंबाबाई मंदीर परिसर), शिवाजी रोड, हत्तीमहल रोड या परिसरात धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे.
संततधार पावसामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये धोकादायक इमारती कोसळल्याने अनेकांचे बळी गेले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर शहरात पावसाळ्यापूर्वी सुमारे १०० हून अधिक धोकादायक इमारतींच्या मालकांना महापालिकेने जीर्ण इमारती उतरुन घ्याव्यात, इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन घ्याव्यात अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण या नोटींसांना बहुतांशी घरमालकांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट दिसते.
दुमजली तीन घरे उतरली
शहरातील अतिधोकादायक इमारतीच्या गणनेत असलेली बिंदू चौक सबजेल समोरील आझाद गल्लीतील वसंतराव बाबुराव जामदार यांच्या नावे दोन, कमल वसंत सुर्यवंशी यांच्या नावे असणाऱ्या एक अशा सुमारे तीन धोकादायक, जीर्ण झालेल्या दुमजली इमारती महापालिका प्रशासनाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने उतरवल्या. यासाठी २० कर्मचारी तसेच पोलीस व वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले.
प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यास २५ हजाराचा दंड
महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम २६४ (४), २६८(१) नुसार या इमारतीत राहणे धोकादायक असून त्यांनी इमारत रिकामी करावी. कलम २६५ (अ)नुसार नोटीस मिळाल्यानंतर धोकादायक इमारत मालकाने संबधीत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे अन्यथा इमारत मालकास २५ हजार रुपये दंडाला सामोरे जावे लागणार आहे.