अवतरल्या शंभराहून अधिक सावित्रीबाई...
By Admin | Published: January 3, 2017 01:06 AM2017-01-03T01:06:36+5:302017-01-03T01:06:36+5:30
भाकपच्या कार्यक्रमाचे निमित्त : क्रांतीची गरज आहे कशी हे अधोरेखित
कोल्हापूर : चूल आणि मूल या रहाटगाड्यातून स्त्रियांना बाहेर काढत त्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शंभराहून अधिक मुलींच्या वेशभूषेतून आणि त्यांनी व्यक्त केलेल्या विचारातून सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये अवतरल्या आणि आजच्या संदर्भाने क्रांतीची कशी गरज आहे, याचे अंजन घातले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने माजी सरचिटणीस कॉ. ए. बी. बर्धने यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. नामदेव गावडे, प्रा. डॉ. छाया पवार उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी अनिल चव्हाण होते. यावेळी षण्मुखा आर्दाळकर, अंजली जाधव, सुनंदा चव्हाण, बी. एल. बरगे, उषा कोल्हे उपस्थित होत्या.
नामदेव गावडे म्हणाले, वेशभूषा केली म्हणजे आपण सावित्री झालो असे नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणावेत. बालविवाह, हुंडापद्धतीचा विरोध केला पाहिजे. शिक्षणासाठी झटले पाहिजे. प्रगती साधण्यासाठी विद्यार्थी, युवक, महिला, मजूर, कामगारांनी एकत्र आले पाहिजे. धर्माच्या नावाखाली होत असलेल्या विभाजनाला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. छाया पवार यांनीही मुलींना मार्गदर्शन केले.
यानंतर कोल्हापुरातील विविध शाळांमधून आलेल्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी ‘मी सावित्री बोलतेय’ या विषयावर एकपात्री प्रयोग सादर केले. मुलींची शाळा सुरू करताना जोतिराव फुलेंनी सावित्रीबार्इंना दिलेली साथ, सनातन्यांनी त्यांना दिलेला त्रास, शाळेमुळे मुलींची झालेली प्रगती हे सगळे मनोगत या मुलींनी सावित्रीबार्इंच्या मनोगतात मांडले. आजच्या काळाशी त्याचा संदर्भ जोडत परीक्षा हॉलमध्ये जळणारी रिंकू, भरचौकात मारली जाणारी अमृता देशपांडे, तंदूर भट्टीत भाजून निघणारी नयना, इस्लामपूर येथे प्राण गमावलेली आरती यासह बलात्कारासारख्या गुन्ह्णांना बळी पडणाऱ्या तरुणी. हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या आदी विषयांवर मुलींनी एकपात्री कार्यक्रम सादर केला. यात आसुर्ले केंद्र शाळा, पोर्ले केंद्र शाळा, माझी शाळा, प्रबुद्ध भारत, राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलमधील ११८ मुलींनी सहभाग घेतला. बी. एल. बरगे यांनी प्रास्ताविक केले. सतिशचंद्र कांबळे यांनी कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली.
स्त्रीला जोखडातून मुक्त करण्यासाठी सावित्रीबार्इंनी सनातन्यांचा त्रास सहन करत मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शाहू स्मारक भवन येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमासाठी आलेल्या या आधुनिक सावित्री आता आॅनलाईन जगात वावरू लागल्या आहेत.