सात कोरोना रुग्णांच्या सेवेत १५० हून अधिक डॉक्टर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:43+5:302020-12-07T04:19:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला, सध्या ‘सीपीआर’ रुग्णालयात अवघे सात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग उपचार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे ओसरला, सध्या ‘सीपीआर’ रुग्णालयात अवघे सात ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग उपचार घेत आहेत; पण या सात रुग्णांच्या सेवेला निवासी डॉक्टरांसह तब्बल १५० हून अधिक डॉक्टरांची ड्यूटी लावली आहे. त्यामुळे यांपैकी कितीजण रुग्णालयात दिसतात हा चिंतेचा विषय असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत सुरू आहे. शिवाय भूलतज्ज्ञ डॉक्टरांनाही ‘कोविड ड्यूटी’ लावल्याने ‘सीपीआर’मधील तब्बल २० हून अधिक ‘ऑर्थो’च्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
गेले आठ महिने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सीपीआर हे ‘कोविड रुग्णालय’ बनले होते. गेले दोन महिने जिल्ह्यातील कोरोना हळूहळू आटोक्यात आला आहे. आज, सोमवारपासून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत आहे. सध्या सीपीआर रुग्णालयात फक्त सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत; पण त्या रुग्णांच्या सेवेला तब्बल १५० हून अधिक डाॅक्टरांचा ताफा उपलब्ध आहे. यामध्ये निवासी डॉक्टरांचाही समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने डॉक्टर ड्यूटीवर आहेत; पण ते कोठेच दिसत नाहीत. काहीजण तरी ड्यूटी असूनही ‘सीपीआर’कडे फिरकत नसल्याची चर्चा सुरू आहे.
‘सीपीआर’मध्ये शस्त्रक्रियेसाठी भुलीचे डॉक्टर उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. सुमारे १० हून अधिक भूलतज्ज्ञ डॉक्टरांची ‘कोविड ड्यूटी’ अद्याप सुरू आहे; त्यामुळे ‘सीपीआर’मधील सुमारे २० हून अधिक शस्त्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. ज्या प्राध्यापक डाॅक्टरांचा शस्त्रक्रियेशी संबंध नाही, अशा डॉक्टरांना कोविड ड्यूटी लावावी. ज्याचे काम त्यालाच करण्याचे नियोजन करावे, अशा प्रतिक्रिया कर्मचारी वर्गातून उमटत आहेत.
कोविड कालावधीत ‘सीपीआर’ प्रशासनाचे चांगले काम झाल्याने इतर खासगी रुग्णालयांत जनआरोग्य योजना असूनही सर्वसामान्यांना उपचारासाठी‘‘सीपीआर’चाच मोठा आधार वाटतो. त्यामुळे उपचारासाठी येथे रुग्ण वाढतात.
पंधरा दिवस प्रतीक्षाच!
गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ ‘ऑर्थो’च्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग़्ण येत आहेत. फक्त अत्यावश्यक, दिवसातून एखादी शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया प्रलंबित ठेवल्या असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांतून संताप व्यक्त होत आहे.