राज्यातील २ लाखाहून अधिक फ्रंट, हेल्थ वर्कर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:23 AM2021-05-16T04:23:17+5:302021-05-16T04:23:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाविरोधातील लढाईमध्ये अग्रभागी असलेले राज्यातील २ लाख ८ हजार ८८५ फ्रंट लाईन आणि हेल्थ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाविरोधातील लढाईमध्ये अग्रभागी असलेले राज्यातील २ लाख ८ हजार ८८५ फ्रंट लाईन आणि हेल्थ वर्कर अजूनही कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. यातील अनेकांची पहिल्या निकषानुसारची ४५ दिवसांची मुदत संपूनही गेली. परंतु आता नव्या १२ ते १६ आठवड्यांच्या निकषानुसार या सर्वांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.
राज्यामध्ये १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यामध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स आणि कर्मचारी, त्यानंतर महसूल, पोलिस, पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी जे फ्रंटलाईनवर काम करतात अशांना प्राधान्य देण्यात आले होते. परंतु लसीबाबत सर्वसामान्यांच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या शंका या कर्मचाऱ्यांच्याही मनात होत्या. त्यामुळे अनेकांनी पहिल्या टप्पात लसच घेतली नाही. काही मोठ्या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी तर ज्यांनी दुसरा डाेस घेतला आहे त्यांना त्याचा काय फायदा होतेा की तोटा होतो हे पाहिल्यानंतर आपण पहिला डोस घेणार असल्याचे सांगत होते.
मात्र नंतरच्या काळात सरकारने ज्येष्ठ आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू केले आणि अनेकांनी पहिला डोस घेतला. कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आणि त्यानंतरच्याच काळात राज्यभर लसीची टंचाई निर्माण झाली. तसेच काहींना पहिल्या डोस नंतर त्रास झाल्याने, पुन्हा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने अनेकांची दुसऱ्या डोसची मुदत संपतही आली.
अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशल्डचा दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांच्या दरम्यान घेण्याच्या सूचना दिल्याने आता या सर्वांना प्राधान्याने कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
हेल्थ वर्करचीच संख्या अधिक
कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठीची संख्या पाहता आरोग्य विभागातीलच कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून येते. याउलट फ्रंटलाईन वर्करनी दुसरा डोस घेण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. कारण राज्यातील ५९ हजार ४६२ फ्रंटलाईन वर्कर दुसरा डोस घेणे बाकी असून १ लाख ४९ हजार ४२३ हेल्थ वर्करनी अजूनही दुसरा डोस घेतलेला नाही.