इराणी खणीत २५०हून अधिक मूर्र्र्तींचे विसर्जन
By admin | Published: September 17, 2016 12:46 AM2016-09-17T00:46:40+5:302016-09-17T00:58:29+5:30
विसर्जनप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यातून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाचे एक अधिकारी, एक तांडेल व १० जवान तब्बल ३० तासांहून अधिक काळ लक्ष ठेवून होते.
कोल्हापूर : शहरातील मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील दुसऱ्या खणीत सुमारे अडीचशेहून अधिक मूर्तींचे कोणत्याही अडथळ््यांविना विसर्जन झाले. विसर्जन पाहण्यासाठी खणीभोवती नागरिकांनी गुरुवारी उशिरा रात्रीपर्यंत मोठी गर्दी केली होती. ३० तासांहून अधिक काळ विसर्जन सुरू होते.
इराणी खणीत गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून मूर्ती विसर्जनास प्रारंभ झाला. पहिल्या विसर्जनाची नोंद मंगळवार पेठेतील ‘बरसो रे, बरसो गु्रप’ची गणेशमूर्ती विसर्जनाची झाली. दरवर्षी विसर्जनातील वाढणाऱ्या मूर्तींची संख्या लक्षात घेऊन यंदा महापालिकेने चार तराफे व १०० हून अधिक कर्मचारी व स्वयंसेवक व्यवस्था केली होती. यासह खणीभोवती सुरक्षेसाठी लोखंडी जाळी मारली होती. विसर्जनप्रसंगी काही अनुचित प्रकार घडल्यास त्यातून कार्यकर्त्यांचा बचाव करण्यासाठी अग्निशमन दलाचे एक अधिकारी, एक तांडेल व १० जवान तब्बल ३० तासांहून अधिक काळ लक्ष ठेवून होते.
इराणी खणीसह नजीकच्या खणीतही मंडळांनी मूर्र्तींचे विसर्जन केले. या नव्या खणीत ११ फुटांपेक्षा मोठ्या मूर्ती विसर्जित केल्या जात होत्या. या दोन्ही खणींत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २६२ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. त्यामध्ये २१ फुटांची एक, तर १५ फुटांच्या ४, १४ फुटांच्या दोन, ११ फुटांच्या ८, तर १० फुटांच्या १४ गणेशमूर्तींचा समावेश होता. कोटितीर्थ, पंचगंगा नदी, येथे दान करण्यात आलेल्या गणेशमूर्तीही या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या. त्यामध्ये गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता पूल गल्ली तालीम मंडळाची २१ फूट गणेशमूर्तीचा समावेश होता. या एकवीस फूटी मूर्तीनंतर दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत एकही एकवीस फुटी गणेशमूर्तीचे विसर्जन झाले नव्हते. दुपारनंतर भगवा रक्षक (रविवार पेठ), न्यू चॅलेंज गु्रप (सम्राटनगर), सम्राट चौक तरुण मंडळ, शहीद भगतसिंह तरुण मंडळ, भगवा चौक तरुण मंडळ, श्रमिक युवा मित्र मंडळ, श्री मित्र मंडळ (शुक्रवार पेठ), उशिरा रात्री शिवाजी चौकाचा ‘महागणपती’चेही विसर्जन करण्यात आले.
दरम्यान, विसर्जनासाठी येणाऱ्या मंडळांना क्रशर चौकात सतेज पाटील फौंडेशन व नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यावतीने विविध मंडळांना मानाचे श्रीफळ देण्यात येत होते.
साडेचारनंतर गर्दी
दुपारी तीन वाजेपर्यंत गणेश विसर्जनाचा वेग कमी होता. दुपारी चार वाजेपर्यंत लहान-मोठ्या १११ मूर्तींंचे विसर्जन झाले होते. पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत विसर्जनाचा वेग वाढला. रात्री आठ वाजेपर्यंत इराणी खणीत १८० व नव्या खणीत ३० मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. त्याच दरम्यान, या क्रशर चौक, इराणी खण या परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते.
विसर्जनासाठी महापालिकेने एक अग्निशमन दलाचा बंब एक जेसीबी, दोन हेवी क्रे न, एक रोडरोलर, बांधकाम, आरोग्य, सफाई आदी विभागांतील ६० हून अधिक कर्मचारी व स्वयंसेवक या खणींजवळ तैनात केले होते. त्यांच्यामार्फत मंडळांचे गणपती विसर्जनासाठी मदत केली जात होती. पंचवीसहून अधिक पोलीस साध्या व गणवेशात पहारा देत होते.
गेल्या सहा वर्षांत इराणी खण येथे विसर्जित करण्यात आलेल्या ३ ते २१ फूट मूर्तींचा आकडा
वर्षमंडळांची संख्या
२०१०२६०
२०११२६१
२०१२२८५
२०१३३६६
२०१४ २५०
२०१५३५२