कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजाराहून जास्त भटके श्वान

By admin | Published: March 16, 2017 06:44 PM2017-03-16T18:44:38+5:302017-03-16T18:44:38+5:30

भटक्या श्वानांचा बंदोबस्त कोण करणार; महापालिकेचे नियंत्रणाच नाही

More than 37 thousand stroll dogs in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजाराहून जास्त भटके श्वान

कोल्हापूर जिल्ह्यात ३७ हजाराहून जास्त भटके श्वान

Next

आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : गेल्या वर्षभरात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे गंभीर जखमींसह अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, या भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका तथा शासनाकडे कोणतीही तरतुद नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भटक्या श्वानांची संख्या आवाक्याबाहेर होत आहे. विशेष म्हणजे २०१५ च्या प्राणी गणनेत ३७ हजार ९२३ इतकी भटक्या श्वानांची संख्या पुढे आली आहे. मग या श्वानांचा बंदोबस्त कोणी करायचा असा प्रश्न सर्वांसमोर आवासून उभा आहे.
विशेष म्हणजे श्वानाच्या दंशामुळे रेबीज होऊन मृत्यु पावणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. याकरीता भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यासाठी व त्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडे कोणत्याही स्वरुपाची ठोस योजना अगर तत्सम यंत्रणा नाही. यापुर्वी महापालिका भटक्या श्वानांचा शोध घेऊन त्यांना विष अथवा तत्सम पदार्थ घालून ठार मारत होते. मात्र, यावर स्वंयसेवी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे यानूसार श्वानांना मारु नये, याकरीता रेबीज लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्याची सोय करावी. यासाठी विशेष म्हणजे राज्य शासनाने निधीची तरतुद करावी असेही स्पष्ट केले आहे. पण तरीही यासाठी राज्य शासनाने तरतुद केलेली नाही. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता २०१५ च्या प्राणी गणनेत ३७ हजार ९२३ इतक्या श्वानांची संख्या पुढे आली आहे. त्यात शहरात १० हजाराहून अधिक भटकी श्वाने आहेत. यात केवळ १२०० हून अधिक पाळीव श्वानांच्या मालकांनी आपल्या श्वानांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण केले आहे. भटक्या श्वानांना मालक नसल्याने ही श्वाने मोकाट फिरत आहेत. यापुर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे केवळ श्वान पकडण्यासाठी ७ कर्मचाऱ्यांची नेमणुक केली आहे. पण सद्यस्थितीत शासनाच्या निर्देशानूसार काम जैसे थे म्हणजे बंद आहे.

श्वान हल्ला का करतात
एखाद्या जनावराला जंगली जनावर अर्थात कोल्हा, अस्वल आदी चावले तर त्यांना रेबीज हा रोग होतो. त्यातून हे जनावर दुसऱ्या जनावराला चावले तर त्यालाही रेबीज होतो. हे संक्रमण पुढे चालत रहाते. त्यात श्वानही सुटत नाही. या रोगामुळे श्वानाचे स्वत:च्या मेंदुवरील नियंत्रण सुटते. मग तो श्वान दिसेल त्याला भितीपोटी चावतो. विशेषत: आॅक्टोबरच्या दरम्यान श्वान माजावर येण्याचा कालावधीत एका स्त्री जातीच्या श्वानापाठीमागे अनेक श्वान गटागटाने फिरत असतात. त्यात एकमेकांवर भांडतात. त्यातून नियंत्रण सुटल्याने दिसेल त्याचा चावा घेत ती सुटतात. त्यात त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तर ते नागरीकांवर हल्ला करुन लचकेही तोडतात. यासाठी श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस टोचणी करणे गरजेचे असते. मात्र, भटक्या श्वानांना ती न मिळाल्याने संक्रमणातून त्यांना रेबीज होतो आणि पुढे नागरीकांचा चावा घेत ही श्वाने सुटतात.

श्वानांमध्ये ही लक्षणे दिसल्यास सावध रहा
सतत लाळ गळणे,
मलूल पडून राहणे
हालचालीवर ताबा नसणे
पाण्याची भिती वाटणे
नाक, डोळे,कानातून पस येणे
सातत्याने भुंकण्याचा प्रयत्न करणे
पिसाळणे

मानवामध्ये रेबीजची लक्षणे
२ ते १२ आठवडे ताप येणे
मानसिक त्रास करुन घेणे
झोप न येणे, भास होणे
पाण्याची भिती वाटणे
घसा खरवडणे

शासकीय पशुसंवर्धन रुग्णालयात गेल्या वर्षभरात २००० पाळीव श्वानांची नसबंदी व लसीकरण करण्यात आले. तर १२५ हून अधिक भटक्या श्वानांवर नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण केले आहे. नागरीकांनी अशी भटकी श्वाने मंगळवार पेठ येथील पशुसंवर्धन रु ग्णालयात आणल्यास त्यांच्यावर मोफत निबीर्जीकरण शस्त्रक्रीया व लसीकरण केले जाईल. नागरीकांसह स्वयंसेवी संस्थानी यात पुढाकार घेतल्यास शासनातर्फे विशेष शिबीरही आयोजित केले जाईल. शहरात साधारण दहा हजार इतकी भटकी श्वाने आहेत. शासनातर्फे आपल्या रुग्णालयात वर्षातून दोन वेळा मोफत लसीकरण केले जाते.
- डॉ. सॅम लुद्रिक, पशुधन विकास अधिकारी, कोल्हापूर

२००९-१० साली कोल्हापूर महापालिकेतर्फे ५ हजार ५०० भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण व निर्बीजीकरण शस्त्रक्रीय करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र, शासनाकडून पुरेसा निधी नसल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानूसार भटक्या श्वानांना मारण्यावर व नियंत्रणावर प्रतिबंध आला आहे. महत्वाची बाब म्हणून कोल्हापूरात स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून येत्या १५ दिवसांत केवळ भटक्या श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण केले जाणार आहे. यासाठी जीवरक्षा अ‍ॅनिमल केअर ट्रस्टला झूम प्रकल्पालगत जागा दिली जाणार आहे. त्यासंबधी स्थायी समितीसमोर हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यानूसार येत्या काही दिवसांत भटक्या श्वानांवर नियंत्रण आणू.
- डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महापालिका

कोल्हापूरात कोणत्याही प्रकारचे भटक्या श्वानांसाठी शेल्टर हाऊस नाही. त्यामुळे आम्ही २००५ पासून शाहूपुरी २ री गल्ली येथील घरीच अशा भटक्या कुत्र्यांच्या पिले व जखमी अवस्थेत असलेल्या श्वानांवर उपचार करुन त्यांची देखभाल करीत आहोत. जिल्ह्यात २०१५ च्या अहवालानूसार ३७ हजार ९२३ इतके श्वान होते. त्यात वाढ झाल्याची शक्यता आहे. शासन दरबारीही आपण यासाठी स्वयंसेवी संस्था म्हणून वाढत्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी महापालिकेकडे एक प्रकल्प सादर केला आहे. यात केवळ दोन रुम इतकी जागेची मागणी केली आहे. महापालिकेकडे गेल्या काही वर्षातील पाठपुराव्यानंतर येत्या काही दिवसांत कसबा बावडा येथील झूम प्रकल्पालगत दोन रुम ची जागा देण्याचे मान्य केले आहे. त्यानूसार या ठिकाणी एक शस्त्रक्रीया खोली व एक रिकव्हरी खोली तयार करण्यात येणार आहे. यासाठी दानशूर व्यक्तिंनी पुढे आल्यास भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवता येईल. यासाठी लागणाऱ्या लसी व साहीत्य खरेदी करता येईल.
-कल्पना भाटीया , विश्वस्त, जीवरक्षा अ‍ॅनिमल केअर ट्रस्ट, कोल्हापूर

Web Title: More than 37 thousand stroll dogs in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.