तब्बल ८० फाईल्स प्रलंबित
By admin | Published: March 4, 2017 12:34 AM2017-03-04T00:34:00+5:302017-03-04T00:34:00+5:30
स्थायी सभा : सूत्रधार कोण, प्रशासनाला विचारला जाब
कोल्हापूर : कर्मचाऱ्यांच्या पगारातील फरकाची रक्कम देण्यावरून लाच मागण्याचा प्रकार महापालिकेत चांगलाच गाजला. याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत अप्रत्यक्ष उमटले. पैशासाठी आस्थापनातील कर्मचाऱ्यांकडे अशा किती फाईल्स प्रलंबित आहेत, यामागील मुख्य सूत्रधार कोण? असा जाब या सभेत विचारण्यात आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. प्राथमिक स्थितीत अशा कालबद्ध पदोन्नतीच्या ८० फाईल्स प्रलंबित राहिल्याचे उजेडात आले. प्रशासनाचा कारभार पारदर्शी करून तातडीने अशा फाईल्स निकाली काढण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती डॉ. संदीप नेजदार होते.
कर्मचाऱ्याच्या पगारातील फरकाची रक्कम देण्यासाठी लाचेची मागणी करणारा पहारेकरी कुंदन लिमकर हा जाळ्यात सापडला होता. त्याच पार्श्वभूमीवर आस्थापना विभागात अनेक फाईल्स पैसे दिले नसल्याने प्रलंबित ठेवण्यात आल्याबाबत जयश्री चव्हाण यांंनी प्रश्न उपस्थित केला. या विभागाचे खातेप्रमुख कोण आहेत? आस्थापना विभागाकडे अशा किती फाईल्स प्रलंबित आहेत, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. या प्रकरणाच्या चौकशीचीही त्यांनी मागणी
केली.
प्रशासनाने तातडीने तासाभरात आढावा घेतला. प्राथमिक स्थितीत सुमारे ८० प्रकरणांच्या फाईल्स प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले; पण आस्थापनातील अशा कालबद्ध पदोन्नतीबाबत अपुरी कागदपत्रे असल्याबाबत खुलासाही केला. तसेच ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले. अशा प्रकरणांत पारदर्शी कारभार असावा, अशाही अपेक्षा सदस्यांनी केल्या.
वर्कशॉपमधील एम. डी. सावंत यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशीअंती निलंबनाची कारवाई करू, असे एका प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले; तर शहरातील पाणीपुरवठ्यात पक्षपातीपणा होत असल्याने योग्य नियोजन करावे, झूम प्रकल्पावरील इनर्ट मटेरियल शिफ्टसाठी निविदा, प्लास्टिक पिशव्या विक्रीस बंदी या विषयांवरही मनीषा कुंभार, आशिष ढवळे, निलोफर आजरेकर, उमा इंगळे यांनी चर्चा केली.
‘ती’ हॉटेल्स तपासणार
हॉटेलमध्ये तयार होणारे सांडपाणी शहरातील सर्व हॉटेल्सनी ड्रेनेज लाईनला जोडल्याने ड्रेनेज लाईन तुंबत असल्याचे सभापती नेजदार, नीलेश देसाई, आशिष ढवळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे डे्रनेज लाईनवर ताण पडत आहे. हॉटेल व्यावसायिकांना स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्रे सक्तीची नाहीत का? असाही प्रश्न विचारला. त्यावर शहरातील ३७ हॉटेलची तपासणी झाली आहे. उर्वरित हॉटेलची तपासणी सोमवारपर्यत पूर्ण करू, असे प्रशासनाने सांगून त्यानुसार अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.