कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:05+5:302021-07-24T04:16:05+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असून, विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती ...

More than 80 villages in Kolhapur district were cut off | कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर जिल्ह्यातील ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

Next

कोल्हापूर : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच असून, विविध धरणांतूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने कोल्हापूरसह जिल्ह्यातील पूरस्थिती २०१९ पेक्षाही गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचाही संपर्क तुटला आहे.

कोल्हापूरजवळच्या राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची ४३ फूट पाणी पातळी धोक्याचा इशारा मानली जाते. गुरुवारी रात्री १२ वाजता ही पातळी गाठली गेली होती, तर शुक्रवारी सायंकाळी ही पातळी ५४ फुटांपर्यंत गेली होती. जिल्ह्यातील १२५ हून अधिक बंधाऱ्यांवर पाणी आले असून, ८० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पाणी शिरल्याने हे कार्यालय जिल्हा परिषदेत हलविण्यात आले आहे. आतापर्यंत १५०० हून अधिक कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही राधानगरीसह अन्य काही धरणांचे दरवाजे उघडलेले नाहीत. ते उघडल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.

कोल्हापुरात अनेक मोठ्या रुग्णालयांमध्येही पाणी शिरले असून, तेथील रुग्ण हलविताना नातेवाईक, कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. भुदरगड तालुक्यातील पांगिरे येथील पुलावर अडकलेल्या ट्रॅव्हलमधून ११ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील कर्नाटकच्या बसमधून १५ हून अधिक प्रवाशांची सुटका करण्यात आली. एनडीआरएफच्या दोन टीम गुरुवारी, तर एक टीम शुक्रवारी दाखल झाल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पूर आणि भरलेला रंकाळा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याने अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अखेर केवळ शासकीय वाहने आणि आपत्कालीन यंत्रणेतील वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: More than 80 villages in Kolhapur district were cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.