कोल्हापुरातील कळंबा कारागृहात सापडले ५० हून अधिक मोबाइल, क्लीन स्वीप मोहिमेद्वारे शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 11:45 AM2024-04-13T11:45:28+5:302024-04-13T11:46:01+5:30
कळंबा कारागृहाची तटबंदी अधिक भक्कम होणार
सचिन यादव
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह सातत्याने मोबाइल, गांजा, टोळीयुद्धासह अन्य कारणांनी चर्चेत आहे. मात्र आता कारागृहाची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे. क्लीन स्वीप मोहिमेत कारागृहाची झडती घेताना ५० हून अधिक मोबाइल सापडल्याने प्रशासनही चक्रावले. हे रोखण्यासाठी तटबंदीची उंची २४ फूट होणार आहे. त्यासह अवैधरीत्या मोबाइल वापरण्याची सवय संपविण्यासाठी कैद्यांना ॲलन स्मार्ट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाचा कार्यभार शामकांत चंद्रकांत शेडगे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने क्लीन स्वीप मोहिमेची सुरुवात केली. तंबाखूच्या १३ पुड्यांमध्ये २१४ ग्रॅम गांजा सापडल्यानंतर कारागृहातील कैद्याकडे ५० मोबाइल सापडल्याने प्रशासनही हडबडले. संबंधित कैद्यावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून सध्या कारागृहाच्या तटबंदीची उंची १८ फूट आहे. आता या तटबंदीची उंची ६ फुटांनी आणखी वाढविली आहे. या सहा फुटांत मोठी जाळी बसविण्याचे काम सुरू आहे. कैद्यांना मदत करणाऱ्यांना वाढीव उंचीवरून मोबाइल, पुड्या फेकता येणार नाहीत. त्यातूनही साहित्य फेकले तर ते बरॅकच्या ऐवजी अंतर्गत रस्त्यावर पडेल, अशी काळजी घेतली जाणार आहे.
मोबाइल, गांजा आला कसा?
तंबाखूच्या पुड्यांमधून कारागृहात पोहोचलेला गांजा कोणी आणि कोणासाठी पाठवला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाइल कारागृहात आले कसे, याचा शोध घेण्याचे आव्हान कारागृह पोलिसांसह जुना राजवाडा पोलिसांसमोर आहे.
गांजा पुरवण्याचा नवा फंडा
यापूर्वी बॉल, रिकाम्या बाटल्या आणि कागदाच्या पुड्या बांधून कारागृहाच्या भिंतीवरून गांजा आत फेकला जात होता. बॉलमध्ये गांजा भरूनही फेकला जातो.
बाहेरून कैद्यांना मदत पुरविण्यासाठी भिंतीजवळून संबंधित साहित्य कापडी गठ्ठ्यातून आत फेकले जाते. हे रोखण्यासाठी आता जाळीचे सुरक्षा कवच आहे.
कारागृहात काय फेकतात?
गांजा, मोबाइल संच, पेन ड्राइव्ह, चार्जिंग कॉड, एमसीलच्या पुड्या, चाकू, हत्यारे, ब्लेड.
कारागृहात २२२० कैदी
कळंबा मध्यवर्ती कारागृहात २२२० कैदी आहेत. कारागृहाची क्षमता १६९९ इतकी आहे.
आठवड्यातून तीन दिवस बोलण्याची संधी
स्मार्टकार्डच्या माध्यमातून ज्या कैद्यांची फोन नंबरची पडताळणी पोलिसांकडून झाली आहे, त्यांनाच ॲलन स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाईल. आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी सहा मिनिटे बोलण्याची संधी दिली जाईल.
अपर पोलिस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवाचे अमिताभ गुप्ता, कारागृह डीआयजी स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे निश्चितच कारागृहातील गैरप्रकाराला आळा बसेल. - शामकांत शेडगे, कारागृह अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह