चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 12:46 PM2020-04-14T12:46:32+5:302020-04-14T13:27:12+5:30

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने गावी यायचे कसे, या विवंचनेत ते आहेत.

More than thirty thousand people are trapped in Mumbai | चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग

चार तालुक्यांत अस्वस्थता --तीस हजारांहून अधिक लोक मुंबईत अडकून : गावी येण्यासाठी बसेसचे बुकिंग

googlenewsNext

कोल्हापूर : नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेलेले गडहिंग्लज,आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यातील तीस हजारांहून अधिक लोक अजूनही मुंबईत अडकून पडले आहेत. ‘लॉकडाऊन’ आज मंगळवारी उठेल आणि गावी जायचे म्हणून त्यांनी खासगी बसेसचे बुकिंग केले आहे, परंतु तोपर्यंत लॉकडाऊन वाढल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे. कधी एकदा गावाला येईन, यासाठी ते आतूर झाले आहेत.

नोकरी, रोजगाराच्या निमित्ताने शाहूवाडी तालुक्यातील लोक सर्वाधिक गावाबाहेर राहात असल्याचे चित्र आहे. ज्या तालुक्यात औद्योगीकरण फारसे झाले नाही, साखर कारखानदारी किंवा तत्सम उद्योग विकसित झालेला नाही, शेती पिकाऊ नाही, अशा तालुक्यांतील लोक गाव सोडून जास्त बाहेर आहेत. शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, भुदरगड या तालुक्यांचे अर्थकारण हे मुंबईशी जोडलेले आहे. त्यामुळे या तालुक्यांतून कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर आलेल्यांची संख्या ही ४२ हजार ८२२ इतकी आहे. परंतु अजूनही सुमारे ३० हजार लोक तिथे आहेत. हे लोक छोट्या-छोट्या खोल्यांत राहतात. शिफ्टमध्ये काम करतात आणि अनेकजण डबे खात होते. परंतु आता बाहेर पडता येत नसल्याने सगळ््यांनाच छोट्या खोलीत नुसते बसणेही मुश्कील झाले आहे.

कारखाने बंद असल्याने नोकरी नाही. डबे बंद असल्याने जेवणाचीही आबाळ होत आहे. प्रचंड उष्मा आहे आणि मनांत भीतीचे काहूर. त्यामुळे ही स्थिती बदलेपर्यंत आपल्या गावी जावे, असे त्यांचे प्रयत्न होते. त्यासाठी खासगी लक्झरी बसेसची त्यांनी नोंदणी करून ठेवली होती; परंतु आता लॉकडाऊन वाढल्याने गावी यायचे कसे, या विवंचनेत ते आहेत.

 

मुंबईत ज्या परिसरात कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत, तिथे लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. त्यामुळे तिथून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. तुम्ही आहे तिथेच थांबा. गावी येण्याचा प्रयत्न करून अडचणी वाढवू नका, असे निरोप गावांकडील मंडळी त्यांना देऊ लागली आहेत.

 

आम्हाला गावी यायचे आहे, काहीतरी करा म्हणून मुंबईकर लोकांचे रोज फोन येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही याबाबत संपर्क साधला. खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घालावा, असे प्रयत्न सुरू आहेत. गावी येण्यासाठी हे लोक आसुसलेले आहेत.
राजेश पाटील
आमदार, चंदगड मतदार संघ

Web Title: More than thirty thousand people are trapped in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.