करवीरी दौडले वीर... कोल्हापूर मॅरेथॉनमय, साडेसहा हजारांहून अधिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 08:41 PM2020-01-05T20:41:35+5:302020-01-05T20:42:14+5:30
कोल्हापूर : कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील शतकोत्तर परंपरेत मैलाचा दगड ठरलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ने रविवारी इतिहासाचे आणखी एक पान ...
कोल्हापूर : कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील शतकोत्तर परंपरेत मैलाचा दगड ठरलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ने रविवारी इतिहासाचे आणखी एक पान सुवर्णाक्षरांनी लिहिले. केवळ कोल्हापूर, सांगली, साताराच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साडेसहा हजारांहून अधिक आबालवृद्ध धावपटूंनी महामॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून यापूर्वीचे रेकॉर्ड ब्रेक केले. स्पर्धेने अचूक वेळ साधत वक्तशीरपणा, शिस्तबद्धता, सुनियोजन या बाबतींतही एक मानदंड निर्माण केला. जातपात, धर्म, भाषा, प्रांत यांच्याही पलीकडे जाऊन सुदृढ आरोग्य आणि खेळातून एकात्मता साधत ‘आम्ही भारतीय आहोत,’ असा अद्वितीय संदेश या महामॅरेथॉन स्पर्धेने देशाला दिला. यापुढील महामॅरेथॉन २ फेब्रुवारीला नागपूर येथे होणार आहे.
रविवारी पहाटेच्या आल्हाददायक गारव्यात पार पडलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धेतील खेळाडूंमध्ये असणारी जिंकण्याची जिद्द, चिकाटी आणि घेतलेल्या अपार मेहनतीचे प्रदर्शन तर झालेच; शिवाय ‘उत्तम आरोग्यासाठी धावा आणि चांगले आयुष्य जगा,’ असे सुचविण्याकरिता धावणाºया आबालवृद्धांच्या चेहºयावरील कमालीचा उत्साह, मनातील आत्मविश्वास आणि तल्लख बुद्धीचेही जाहीर प्रदर्शन झाल्याचे पाहायला मिळाले. महामॅरेथान एक जिंकण्याची स्पर्धा तर होतीच; शिवाय लेझीम, ढोल-ताशांसारखी पारंपरिक वाद्ये, पोलीस बॅँड, अल्फान्सो बॅँड, डी.जे.च्या तालावरील नृत्य, नटखटे मिकीमाऊस, आदी थिरकायला लावणाºया सांस्कृतिक कार्यक्रमामुळे या महामॅरेथॉनने एक वेगळ्या वलयासह सांस्कृतिक परंपराही जोपासली.
महामॅरेथॉनच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्टÑातील धावपटूंची मांदियाळी शनिवारपासूनच गोळा व्हायला सुरू झाली होती. कधी एकदा फ्लॅगआॅफ होतोय आणि मी त्यामध्ये धावतोय, अशीच उत्कंठा धावपटूंच्या चेहºयावर जाणवत होती. भल्या पहाटे चार वाजल्यापासून शहराच्या विविध भागांतून धावपटू आणि त्यांचे नातेवाईक, कुटुंबीयांची पावले पोलीस कवायत मैदानाकडे वळू लागली होती. वक्तशीरपणा हे स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य असल्यामुळे सगळे धावपटू वेळेवर मैदानावर उपस्थित होते. पहाटे साडेपाच वाजता धावपटूंना आवश्यक असलेल्या वॉर्मअपकरिता झुंबा डान्स घेण्यात आला. संगीताच्या ठेक्यावर झुंबा डान्स सुरू होताच धावपटू जीवनातील आणखी एक शर्यत धावण्यासाठी सज्ज होऊ लागले. शिवाय गारठलेल्या वातावरणातही उबदारपणा तसेच सळसळता उत्साह निर्माण व्हायला लागला.
पहाटे पाच वाजून ५० मिनिटांनी जेव्हा २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनमध्ये धावणाºया धावपटूंना जेव्हा स्टार्टअप पॉर्इंटला येण्याचे आवाहन करण्यात आले तेव्हा मात्र सर्वांच्यात नजरा धावपटूंकडे रोखल्या गेल्या आणि खºया अर्थाने स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू झाले. फाईव्ह... फोर... थ्री... टू ...वन अॅन्ड गो... असे सांगताच मान्यवर पाहुण्यांनी फ्लॅगआॅफ केला तसे धावपटूंनी लक्ष्याच्या दिशेने धाव घेतली. यावेळी धावपटूंचा उत्साह वाढविण्याकरिता ढोल-ताशाचा गजर झाला. आतषबाजी करण्यात आली. पुष्पवृष्टी करण्यात आली. या गटात सर्वच धावपटू प्रोफेशनल असल्याने त्यांच्या धावण्यातील लय आणि शिस्त काही वेगळीच होती.
त्यानंतर अर्ध्या तासाने १० किलोमीटर अंतर धावणाºया धावपटूंना स्टार्टअप पॉइंटजवळ येण्याची सूचना झाली. प्रत्येक धावपटूमध्ये एक वेगळाच उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. याच क्रमाने पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अंतराची मॅरेथॉन सोडण्यात आली. सगळ्यांच्या टाळ्या घेतल्या त्या दिव्यांगांच्या मॅरेथॉनने! तीन किलोमिटर मॅरेथॉन शर्यत ही फॅमिली रन असल्यामुळे यामध्ये अनेकांनी सहकुटुंब भाग घेतला. लहान-लहान मुलांसोबत धावताना त्यांच्या आईवडिलांनीही मनसोक्तपणे धावण्याचा अद्भुत आनंद लुटला. प्राथमिक, माध्यमिक शाळेची मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, कॉलनीतील मित्रमंडळी यांनी सामूहिकपणे भाग घेतला. कुटुंबासोबत धावल्याचा, एका मोठ्या स्पर्धेत सहभागी झाल्याचा, शर्यत पूर्ण केल्याचा तसेच महामॅरेथॉनचे मेडल गळ्यात पडल्याचा सुखावणारा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर पहायला मिळाला. चारही गटांतील शर्यत पूर्ण झाल्यावर सर्व धावपटूंनी उत्साहाच्या भरात पोलीस कवायत मैदानावर संगीताच्या तालावर ठेका धरत मनसोक्त नृत्य केले. सेल्फी पॉइंटवर फोटो काढले.