विमाने उतरण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे, कोल्हापूर सल्लागार समिती बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:01 PM2018-06-08T22:01:50+5:302018-06-08T22:02:52+5:30
येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.
कोल्हापूर : येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. वीज खात्याचे मोठे टॉवर हलविण्याचेही मोठे काम शिल्लक असून, याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकीकडे कोल्हापुरात मोठी विमाने उतरण्यासाठी तसेच रात्रीची सेवा सुरू राहण्यासाठी वाढीव धावपट्टी आवश्यक आहे. त्यासाठी नऊ एकरांहून अधिक जागा लागणार आहे. यामध्ये ३0 हून अधिक शेतकऱ्यांची जमीन असून तिची मोजणी करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. विमानतळाच्या दक्षिण बाजूला सध्या वापरला जाणार रस्ता हा विमानतळाच्या हद्दीत असल्याने तो बंद करून पर्यायी रस्ता देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
गडमुडशिंगीच्या हद्दीत असणारे छोटे मंदिर, अनेक होर्डिंग्ज, टॉवर, सिंटेक्सच्या टाक्या असे एकूण १२५ पेक्षा अधिक अडथळे दूर करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तेव्हा येथे वीजखात्याचे उपकेंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा मोठा प्रश्न असून त्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीनंतर खासदार महाडिक म्हणाले,भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने उजळाईवाडी विमानतळाचा विकास आराखडा तयार केला होता. सध्या विमातळावर १४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ८0 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. राज्य शासनानेही आपला ३0 टक्के खर्चाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील कामे वेगाने सुरू असून विमानतळ लवकरच सुसज्ज होईल. प्रवाशांसाठीही आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी पुरविण्याच्या सूचना यावेळी महाडिक यांनी केल्या.
विमानतळ प्राधिकरणाच्या संचालिका पूजा के. मूल यांनी कामांविषयी सादरीकरण केले. बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समीर शेठ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
नोकरीच्या अमिषापासून सावध राहण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहन
विमानतळाचा विकास वेगाने होत असल्यामुळे काही अपप्रवृत्ती विमानतळ प्राधिकरणात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक करीत आहेत. अशा व्यक्तींपासून जनतेने सावध राहावे. सध्या विमानतळ प्राधिकरणात कोणत्याही प्रकारची भरती सुरू नाही. तसेच जी भरती होते, ती प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून केली जात असल्यामुळे कोणीही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.