सव्वा दोन लाख भाविकांनी घेतले करवीर निवासीनीचे दर्शन
By admin | Published: May 28, 2017 05:59 PM2017-05-28T17:59:57+5:302017-05-28T17:59:57+5:30
शालेय सुट्टीतील शेवटचा रविवार ठरला गर्दीचा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : राज्यासह परराज्यातून आलेल्या सव्वा दोन लाखांहून अधिक भाविकांनी रविवारी दिवसभरात करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. गर्दीमुळे मंदीर परिसरासह महाद्वार रोड,जोतीबा रोड, भवानी मंडप, शिवाजी चौक आदी परिसर भाविकांच्या मांदीयाळीने अक्षरश: बहरला होता.
संपुर्ण महाराष्ट्राचे साडेतीन शक्तिपीठापैकी एक शक्तीपीठ असलेल्या करवीर निवासीनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वर्षभरात येत असतात. त्यात दिवाळी सुट्टी व उन्हाळी शालेय सुट्टी या दोन कालावधीत लाखो भाविक सहकुटूंब दर्शनाचा लाभ घेतात. यंदाच्या उन्हाळी मे महीन्यातील शेवटचा रविवारपर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. त्यात रविवारी एकाच दिवशी भाविकांची जणु मांदियाळीच फुलली होती. यात विद्यापीठ दरवाजा, सरलष्कर भवन दरवाजा, महाद्वार दरवाजा आणि घाटी दरवाजा या चार प्रवेशद्वारातून पहाटे ५:३० वाजल्यापासून सायंकाळी पाचपर्यंत २ लाख २२ हजार ७५८ भाविकांनी दर्शन घेतले.
शनिवार व रविवार असे सलग दोन दिवस सुट्टी लागल्याने राज्यासह परराज्यातील भाविकांनी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे दिवसभर शहरातील प्रमुख रस्ते पर्यटक भाविकांच्या जथ्यांनी फुलले होते. शिवाजी चौक, बिंदु चौक सब जेल रोड, महाद्वार रोड, जोतीबा रोड, ताराबाई रोड परिसरात दिवसभरात खरेदीसाठी गर्दी होती.मंदीर परिसरात मंडप व पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने भाविकांना उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळाला होता.
करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे दर्शनानंतर अनेक भाविकांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी, वाडी रत्नागिरी येथील केदारलिंग (जोतीबा), कणेरी मठ, न्यू पॅलेस आदी पर्यटनस्थळी जाणे पसंत केले. सायंकाळी सातनंतर गर्दीचा ओघ कमी झाला. गर्दीचा ओघ लक्षात घेऊन शहर वाहतुक शाखेने भवानी मंडपातील दुचाकी वाहनतळ रविवारी दिवसभर बंद ठेवला होता. तर बिंदुचौक, मिसक्लार्क हॉस्टेल, शिवाजी स्टेडीयम, विद्यापीठ हायस्कूल परिसर वाहनतळावर १५ हून अधिक वाहतुक शाखेचे कर्मचारी भाविकांच्या येणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी सातत्याने कार्यरत होते. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असूनही वाहतुक व्यवस्था सुरळीत सुरु होती.