धर्म, राज, अर्थसत्ता एकत्र आल्यास अधिक हिंसक; ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 12:36 PM2024-10-08T12:36:00+5:302024-10-08T12:36:39+5:30
चार्वाक ते पानसरे विचारधारा विवेकाची
कोल्हापूर : धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता एकत्र आल्यास त्या अधिक हिंसक बनतात. त्याचा विरोध केल्यास विचारवंताचा खून केला जातो. तुरुंगात डांबले जाते. विवेकाचा बळी घेतला जातो. अंधश्रद्धेला खत-पाणी घातले जाते. चार्वाक ते पानसरेंपर्यंतच्या विचारधारांनी विवेक जोपासला. त्यांनी दिलेल्या विवेकवादी विचारांसह जगातील सर्वांत मोठा धर्म असलेल्या मनुष्यधर्माची जोपासना करा. कालसाक्षेपतेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे सोमवारी केले.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृतहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानास तुडुंब गर्दी उसळली होती.
‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर द्वादशीवार यांनी श्रोत्यांना विचारशील बनवणारी मांंडणी सुमारे तासभर केली. ते म्हणाले, सध्या देशभरात अडीच लाख लोकांना केवळ चौकशीच्या नावाखाली तुरुंगात डांबले गेले. विवेकवादी विचारांच्या सर्व खुनांचे सूत्रधार एकाच विचारधारेचे आहेत. समाजात सत्ताधाऱ्यांची सत्ता मजबूत करण्याचे काम धर्म करतो. एखादा अपवाद वगळता जगातील कोणत्याही धर्माने महिलांना आणि गरिबांना न्याय दिलेला नाही. धर्माचा मोठा पगडा समाजावर असल्याने त्याची सत्यता कधीच पडताळून पाहिली जात नाही. चार्वाक हे अनुभवाचे पक्के होते. चार्वाक आणि अनुभव आद्यधर्म आहे. कोणीही काहीही सांगितले तरी त्याच्यावर पटकन विश्वास ठेवू नका. अनुभवाच्या कसोटीवर जुने आणि नवे तपासण्याची विचारधारा चार्वाक ते पानसरे या विचारवंतांनी दिली.
नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मनोगत व्यक्त केले. द्वादशीवार यांनी ‘महात्मा गांधी ॲण्ड क्रिटिक्स’ हा इंग्रजी ग्रंथ डॉ. लवटे यांना भेट दिला. डॉ. बी. एम. हिर्डेकर, समितीचे सचिव डॉ. विश्वास सुतार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. समितीचे खजिनदार प्रभाकर हेरवाडे यांनी स्वागत केले. समितीचे अध्यक्ष डाॅ. जी. पी. माळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. निशांत गोंधळी यांनी आभार मानले.
धर्म, राजकारणी लबाड
जगातील प्रत्येक धर्माने आपल्या सोयीनुसार राजकारण केले. त्या-त्या काळाच्या सोयीनुसार धर्मग्रंथात लबाडी केल्या गेल्या. माणुसकीचा धर्म जोपासा अन्यथा केवळ पुण्यतिथी साजरी करणारे अनुयायी म्हणून जगू नका, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.
अनुभव असाही..
हल्ली कोण पुस्तके वाचत नाहीत, व्याख्यानाला येत नाहीत अशी तक्रार समाजात वारंवार ऐकायला मिळते; परंतु वक्ता समाजाला दिशा देणारा असेल तर सभागृहात बसायला जागा राहत नाही याचेच प्रत्यंतर द्वादशीवार यांच्या व्याख्यानावेळी आले.