मोरेवाडी सरपंचांनी राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:19 AM2020-12-07T04:19:01+5:302020-12-07T04:19:01+5:30
पाचगाव : मोरेवाडी येथील ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. यामुळे ...
पाचगाव : मोरेवाडी येथील ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली नाही. यामुळे सरपंच व ग्रामसेवकांनी तत्काळ राजीनामा द्यावा व त्याची कसून चौकशी करावी, अशी मागणी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी केली.
याबद्दल लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असून, यापुढे कोणताही गैरकारभार खपवून घेणार नाही असा इशाराही यावेळी दिला.
कोरोनाच्या या कालावधीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावची स्वच्छता ठेवणे, कोरोना पेशंट सापडलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण, औषध फवारणी करणे अशी वेगवेगळी कामे केली आहेत. या त्यांच्या कामाबद्दल वास्तविक त्यांना बोनस देणे अपेक्षित हिते; मात्र मोरेवाडी ग्रामपंचायतीने २५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या फंडाची रक्कम जानेवारी २०२० ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत त्यांच्या पगारामधून कपात केली आहे; मात्र कर्मचाऱ्यांच्या फंडामध्ये ही रक्कम जमा केलेली नाही, आधीही तब्बल अडीच वर्षांचा फंड भरला गेला न्हवता, यामुळे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या रकमेवरील व्याजास मुकावे लागणार आहे. ग्रामपंचायतीत हुकूमशाही पद्धत सुरू असल्याचा आरोपही आशिष पाटील यांनी केला. कर्मचाऱ्यांचा तत्काळ फंड जमा करावा, तसेच ग्रामसेवक व सरपंच यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेस ग्रामपंचायत सदस्य आशिष पाटील, रियाज नदाफ ,संभाजी मोरे, विकी मोरे, आण्णा मोरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विशाल पाटील, आदी उपस्थित होते.