मराठीवरील प्रेमापोटी मॉरिशसहून थेट कोल्हापुरात, पूर्वशा सखूने घेतला बी. ए.ला प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 04:25 PM2019-02-15T16:25:26+5:302019-02-15T16:26:49+5:30
मराठी मुलांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असताना मॉरिशसमधील विद्यार्थिनी मात्र मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आली आहे. पूर्वशा शांताराम सखू असे तिचे नाव असून, ती गेल्या सात महिन्यांपासून महावीर महाविद्यालयात बी. ए. भाग एकमध्ये मराठीचे धडे गिरवीत आहे.
कोल्हापूर : मराठी मुलांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढत असताना मॉरिशसमधील विद्यार्थिनी मात्र मराठी शिकण्यासाठी कोल्हापुरात आली आहे. पूर्वशा शांताराम सखू असे तिचे नाव असून, ती गेल्या सात महिन्यांपासून महावीर महाविद्यालयात बी. ए. भाग एकमध्ये मराठीचे धडे गिरवीत आहे.
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ अशा शब्दांनी आपण मराठीचे गौरवगीत गातो; पण ज्ञान आणि संवादाची भाषा म्हणून इंग्रजीला प्राधान्य दिले जाते. दुसरीकडे, मॉरिशससारख्या देशात बहुसंख्य नागरिक हे मराठी भाषिक असल्याने तेथील शाळांमध्ये मराठी हा विषय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. पूर्वशाचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी मॉरिशसमध्ये स्थायिक झाले.
तिचे वडील हॉटेलमध्ये मॅनेजर आहेत; तर आई गृहिणी. तिचा जन्मही तिथेच झाला. क्रिओल ही तिथली मातृभाषा; याशिवाय इंग्रजी आणि फ्रेंचही बोलली जाते. पूर्वशाला शाळेत मराठीचे प्राथमिक धडे मिळाले; पण तिथे असलेली मराठीची मागणी आणि शिक्षकांचा अभाव यांचा विचार करून तिने मराठीत पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तिच्या पालकांनी शिवाजी विद्यापीठाशी संपर्क साधला. येथे मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांनी तिला महावीर महाविद्यालयात प्रवेश घेण्याविषयी सुचविले.
पूर्वशाने महावीर महाविद्यालयात जून २०१८ मध्ये बी. ए. भाग एकमध्ये प्रवेश घेतला. या शिक्षणासाठी तिला मॉरिशस सरकारने आफ्रिकन स्कॉलरशिप दिली आहे. तिचे शिक्षण, राहणे, खाणे आणि पॉकेटमनी हा सगळा खर्च मॉरिशस सरकारकडून केला जातो. इथे आल्यानंतर सुरुवातीला तिला मराठी समजायचे; पण बोलता येत नव्हते.
तिला चांगल्या पद्धतीने मराठी शिकता यावे यासाठी महाविद्यालयाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मराठी मुलींसोबत ठेवण्यात आले. महिन्यानंतर ती मराठी बोलायला शिकली. आता तर ती अस्खलित मराठी बोलू शकते. केवळ सात महिन्यांत तिने मराठी भाषा चांगल्या रीतीने आत्मसात केली आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर ती मॉरिशसला पुन्हा जाणार आहे. तिथे मराठीची शिक्षिका व्हायचे तिचे ध्येय आहे