जिल्ह्यातील मदरशांमध्ये झाली शिक्षणाची ‘पहाट’

By Admin | Published: February 15, 2016 12:46 AM2016-02-15T00:46:44+5:302016-02-15T01:11:33+5:30

आशादायक चित्र : नियमित अभ्यासक्रमाचे धडे, सर्वांनाच मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

'Morning' education in madrasa | जिल्ह्यातील मदरशांमध्ये झाली शिक्षणाची ‘पहाट’

जिल्ह्यातील मदरशांमध्ये झाली शिक्षणाची ‘पहाट’

googlenewsNext

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये नियमित शिक्षणाची ‘पहाट’ झाली आहे. त्या मदरशांमधील २४७ विद्यार्थी शासनाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम शिकत आहेत. यंदाच इतक्या मोठ्या संख्येने मदरशांमधील मुले शिक्षणाकडे वळल्याने सकारात्मक पाऊल पडत असल्याचा अनुभव प्रशासनास आला आहे. सर्वच मदरशांमधील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी विशेष बैठक बोलावली आहे.
मदरसे कमी आणि प्रत्येक वर्षी बाहेर पडणारे विद्यार्थी अधिक आहेत. त्यामुळेच फक्त धार्मिक शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या सर्वांनाच भविष्यात मदरशांमध्ये पूजाअर्चा, धार्मिक विधी करून चरितार्थ चालविता येईल, असे सध्याचे चित्र नाही. परिणामी केवळ धार्मिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता असते. नोकरी न मिळाल्यास त्यांना छोटे व्यवसाय आणि मिळेल तेथे कष्टाचे काम करून संसार करावा लागतो. परिणामी हयातभर कष्ट उपसले तरी आर्थिक उन्नती होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मुस्लिम समाजातील कुटुंबे इंग्रजी, मराठी माध्यमांचे शिक्षण पाल्यांना देत आहेत. तंत्रज्ञानाच्या जमान्यात मागे राहू नये याची जाणीव झाल्याने व शिक्षणाचे महत्त्व पटल्याने मदरशांमधील विद्यार्थीही धार्मिकसह नोकरी, रोजगाराभिमुख शिक्षण घेत आहेत.
जिल्ह्यात एकूण १६ मदरसे आहेत. त्यामध्ये १२१९ मुले आणि ६६ मुली आहेत. त्यापैकी हातकणंगले तालुक्यातील दारूल उलूम (शिरोली), निजामिया (आळते), दारूल उलूम दअवतुल इस्लाम (निमशिरगाव), तर शिरोळ तालुक्यातील हजरत अबुहुरेरा रजिअल्ला (कुरुंदवाड) या मदरशांमधील २४७ विद्यार्थी शासकीय अभ्यासक्रम शिकत आहेत.
याशिवाय इमदादूल इस्लाम, दारूल उलूम (आजरा) या मदरशांमधील १३० विद्यार्थी गणित, इंग्रजी, हिंदी, संगणक विषयांचे शिक्षण घेतात. यासाठी २० शिक्षक कार्यरत आहेत. उर्वरित मदरशांमधील विद्यार्थीही शिक्षक व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण प्रशासन सातत्याने पाठपुरावा करीत आहे.


उर्दू माध्यमांच्या १६ शाळांत ३९०१ विद्यार्थी
जिल्ह्यात पहिली ते १२वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण १६ उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामध्ये ३९०१ विद्यार्थी उर्दू शिक्षण घेत आहेत. कोल्हापूर शहरातील दोन शाळांत २७१ मुले आणि ४०३ मुली उर्दू माध्यमाचे शिक्षण घेत आहेत. शासनाचा नियमित अभ्यासक्रमच उर्दू माध्यमातून हे विद्यार्थी शिकत आहेत. यावरून मुस्लिम समाजही शिक्षणात अग्रेसर राहत आहे, हे स्पष्ट होते.


कोणत्या मदरशांमध्ये किती मुले ?
मदरसांनिहाय ६ ते १४ वयोगटातील मुलांची संख्या कंसात अशी : आजरा तालुका - इंदादुल इस्लाम (४०), दारूल उलूम (३५), चंदगड - कासीमूल उलूम (१२५), नुराणी (६०), हातकणंगले -निजामिया, आळते (१२०), दारूल उलूम, शिरोली (२५०), दारूल उलूम दाउत्तुल इस्लाम मदरसा और स्कूल निमशिरगाव फाटा, तारदाळ (१७२), दारूल उलूम दाउत्तुल उस्मान, दावतनगर, कबनूर (४३), गौसिया, इचलकरंजी (४०), चॉँदतारा मर्कज, इचलकरंजी (५२), दारूल उलूम मुणुलिया, खोतवाडी (४०), शिरोळ-आरबिया जहरूल-उलूम, कुरुंदवाड (८८), जामिया खैरूल उलूम, उदगाव (११), जामिया हजरत आबुहुरैरा रजि. जामियानगर, कुरुंदवाड (७३), दारूल उलूम फैजाने गौसिया, आलास, शिरोळ (४०). कुरुंदवाडमधील मोमीन महद आइशा सिद्दिका या मदरशांत ६६ मुली आहेत.


सर्वच मदरशांमधील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. स्वत:हून काही मदरसे धार्मिकसह शासनाच्या अभ्यासक्रमातील शिक्षणही देत आहेत.
- सुभाष चौगुले, शिक्षणाधिकारी
स्पर्धेच्या युगात सर्वच भाषिकांना आधुनिक शिक्षणाची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे मदरशांमधील मुलेही राज्य, केंद्र शासनाच्या अभ्यासक्रमाकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. मदरशांंमध्ये ई-लर्निंगसारखी शिक्षण प्रणाली वापरली जात आहे, ही आनंदाची बाब आहे.- आदिल फरास, माजी सभापती,
स्थायी समिती, कोल्हापूर महापालिकां

Web Title: 'Morning' education in madrasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.