‘माॅर्निंग वाॅक’ आरोग्यासाठी की कोरोनाला घरात आणण्यासाठी..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:05+5:302021-05-21T04:24:05+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा कहर रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले असतानाही अनेकजण माॅर्निंग वाॅकला जात आहेत. हा प्रकार म्हणजे मॉर्निंग ...
कोल्हापूर : कोरोनाचा कहर रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केले असतानाही अनेकजण माॅर्निंग वाॅकला जात आहेत. हा प्रकार म्हणजे मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी की कोरोना घरात आणण्यासाठी, अशी विचारणा होत आहे. त्याला चाप लावून गेल्या १६ दिवसात पोलीस प्रशासनाने १,०६३ जणांवर कारवाई केली आहे.
कोरोना संसर्गाला हरविण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता आहारासोबत व्यायामही आवश्यक आहे. मात्र, तो घरातच केला तरी चालू शकतो. चालण्याऐवजी योगासनाचे प्रकारही करतात येतात. सायकलिंग, वाॅकरवर चालणे आदी प्रकाराने रस्त्यावर चालण्याइतकाच व्यायाम होऊ शकतो. मात्र, अनेकजण पाय मोकळे करण्यासाठी म्हणून सकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत खास ‘माॅर्निंग वाॅक’ला जात आहेत. यावेळी फिरायला गेल्यानंतर फिरणाऱ्यांच्या तोंडावर मास्क नसतो. या दरम्यान ओळखीची व्यक्ती भेटली की गप्पागोष्टी, हस्तांदोलन होतेच. अशावेळी एखाद्याला कोरोना झाला असल्यास तो वाहक म्हणून फिरायला जाणारा स्वत:च्या घरी ही देणगी आणतो. त्यामुळे संसर्गाचा फैलाव होतो. ही बाब जाणून पोलीस प्रशासनाने माॅर्निंग वाॅकला येणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा नागरिकांना सकाळी ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणले जाते. त्यांच्यावर साथीचे रोग पसरविल्याबद्दल गुन्हा नोंदवून ५०० रुपये दंड केला जात आहे.
माॅर्निंग वाॅकबद्दलची निरीक्षणे अशी,
शिवाजी विद्यापीठाबाहेरील रस्ते, फुटपाथ, रंकाळा चौपाटी, अंबाई टॅंक परिसर, कळंबा तलाव परिसर, गिरगाव परिसर, उजळाईवाडी विमानतळ परिसर, देवकर पाणंद - तपोवन मैदान व परिसर आदी ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून अनेकजण खास ‘माॅर्निंग वाॅक’ला येतात. यावेळी चालण्याबरोबर अनेकजण मित्रांबरोबर गप्पा मारत फिरणे, एकमेकांसोबत चहा, विविध औषधी काढे एकत्रित बसून घेणे, एकत्रित व्यायाम करणे, अनेकजण तर लोखंडी बाकड्यांवर बसून गप्पा मारण्यात धन्यता मानतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा यात अधिक समावेश आहे. यासोबतच १६ ते ३० वयोगटातील युवक, तरुण-तरुणीही सकाळी पोलीस रस्त्यावर नसल्याचे पाहून ‘माॅर्निंग वाॅक’ला जात आहेत.
पकडल्यानंतरची कारणे अशी,
१. घर जवळ आहे म्हणून फिरायला आलो.
२. घरात बसून कंटाळा आला म्हणून फिरायला आलो.
३. अनेकजण किमान चार ते पाच किलोमीटर चालल्याशिवाय बरे वाटत नाही म्हणून माॅर्निंग वाॅकला आलो, असे सांगतात.
४. डाॅक्टरांनी सकाळी फिरण्यास सांगितले म्हणून वाॅकला आलो, असे चक्क खोटेच सांगतात.
५. पुन्हा फिरायला येत नाही, मात्र कारवाई करू नका, अशी गयावया करतात.
पोलिसांची कारवाई अशी
दिनांक ४ ते १९ मे २०२१ अखेर १,०६३ जणांवर माॅर्निंग वाॅकला बाहेर पडल्याबद्दल जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यातून ४ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. तत्पूर्वी या नागरिकांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. विशेष म्हणजे बुधवारी (दि. १९) एकाच दिवशी सर्वाधिक ३८० जणांवर कारवाई करताना १ लाख ५६ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या संसर्गाला हरविण्यासाठी घरात बसण्याबरोबरच व्यायाम आवश्यक आहे. माॅर्निंग वाॅकला पर्याय म्हणून घराच्या टेरेसवर फिरलेले बरे. पोलिसांची कारवाई एका अर्थाने बरोबर आहे.
विजय आदमापुरे, कोल्हापूर
प्रतिक्रिया
रोजच्या सवयीप्रमाणे किमान पाच किलोमीटर चालल्याशिवाय बरे वाटत नाही. ही अंगाला सवय झाली आहे. परंतु, कोरोनाच्या काळात पोलिसांच्या ५०० रुपयांच्या दंडात्मक व पोलीस ठाण्यातील वरातीपेक्षा घराच्या टेरेसवर किंवा वाॅकरवर चालण्याचा व्यायाम करणे केव्हाही चांगले.
राम कारंडे, कोल्हापूर