मोरओहोळ ओढ्यावरचा पूल कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 11:57 PM2017-10-01T23:57:26+5:302017-10-01T23:57:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील मिणचे खुर्द ते मोरेवाडी दरम्यानचा मोरओहोळ ओढ्यावर असलेला कोल्हापूर पद्धतीचा पूल पहाटे चारच्या दरम्यान कोसळला. अवघ्या सव्वीस वर्षांत हा पूल कोसळल्याने बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड
झाला आहे. ही घटना पहाटे
घडल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. पूल कोसळल्याने परिसरातील नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा पूल तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
सन १९९१ साली सार्वजनिक बांधकाम विभागाने मिणचे-मोरेवाडी मार्गे गारगोटीला येणारा नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग म्हणून मोरेवाडी येथे मोरओहोळ ओढ्यावर हा पूल बांधला होता.
या पुलाचे दगडी पिलर कमकुवत झाल्याने पात्रातील दोन पिलरपैकी मध्यभागी असलेला पिलर पडल्याने पुलाचा स्लॅब पात्रात कोसळला. पहाटे ही घटना घडल्याने कोणतीच जिवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मिणचे खोरी परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व प्रवासी वर्गास हा मार्ग सोयीस्कर होता. पण पूलच कोसळल्याने नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. कोसळलेल्या पुलाची लांबी ३० मीटर असून रुंदी १६ फूट आहे.
या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ६ किलोमीटर पायपीट करावी लागणार आहे. या घटनेबाबत संबंधित अधिकाºयांकडे माहिती मागितली असता कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे पुढे आले.
घटना घडल्याचे समजल्यानंतर भुदरगडचे तहसीलदार अमरदीप वाकडे दुपारी घटनास्थळी दाखल झाले. पडलेल्या पुलाची पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, उपअभियंता एल. एस. जाधव, शाखा अभियंता डी. व्ही. कुंभार, जमादार यांनी भेट देऊन घटनेची पाहणी करून पुढील उपाययोजना केल्या.
दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, पूल कोसळणे ही बाब गंभीर आहे. अवघ्या सव्वीस वर्षांत हा पूल कोसळल्याने या पुलासह तालुक्यातील इतर सर्व पुलांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.